मुंबई / प्रतिनिधी - सायन कोळीवाडा जीटीबी नगर येथील जुन्या, मोडकळीस आलेल्या पंजाबी कॉलनीतल्या इमारती तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रहिवाशांच्या तीव्र विरोधामुळे कारवाई न करताच हात हलवत परतावे लागले. दरम्यान याप्रकरणी सरकारी कामांत अडथळा आणल्या प्रकरणी जीटीबी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहिवाशांच्या विरोधामुळे गुरुवारी कारवाई करता आली नाही. मात्र येत्या दोन दिवसांत पालिका या इमारतींवर कारवाई करेल, अशी माहिती सहायक आयुक्त उबाळे यांनी दिली.
शीव कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीत 25 इमारती आहेत. मागील अनेक वर्षापासून या इमारती उभ्या आहेत. महापालिकेने 2007-08 साली या इमारती धोकादायक असल्याचे जाहिर केले होते. मुंबईत ज्या इमारती जुन्या, जर्जर होऊन धोकादायक स्थितीत आहेत, अशा इमारती पाडण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार गुरुवारी पालिका प्रशासनाने ही इमारत खाली करण्याबाबतचे आदेश रहिवाशांना दिले. मात्र रहिवाशांनी इमारत खाली करण्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने या इमारतींतील वीज व पाणी जोडणी कापण्याचा निर्णय घेतला. मात्र रहिवाशांनी त्यासही तीव्र विरोध केला. यामुळे पोलिसांच्या मदतीने पालिकेने कारवाईचा प्रयत्न केला. परंतु, रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन रास्ता रोको करून कारवाईला विरोध केला. तसेच वीज व पाणी जोडणी कापू नये यासाठी वीज, पाणी जोडणीच्या केबीन समोर महिला व छोट्या मुलांनी ठिय्या मांडले. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करणे शक्य झाले नाही. या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. रहिवाशांच्या विरोधामुळे पालिकेच्या अधिका-यांना कारवाई न करताच हात हलवत परतावे लागले. स्थानिक आमदार तमील सेलवन, तसेच पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यावेळी उपस्थित होते.