अहमदनगर, दि. 4 जून 2017 -
अहमदनगर जिल्ह्यातील 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय विखे पाटील कुटुंबियांनी घेतला असून, डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज ही घोषणा केली.
येत्या 15 जून रोजी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब सहाय्य योजनेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्यात नोव्हेंबर 2014 पासून आत्महत्या केलेल्या 208 शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालकत्व विखे पाटील परिवार जनसेवा फाऊंडेशनमार्फत 15 जूनपासून स्वीकारणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. या योजनेंतर्गत संबंधीत शेतकरी कुटुंबांच्या अनेक जबाबदाऱ्या विखे पाटील परिवाराने आपल्या खांद्यावर घेतल्या आहेत.
यासंदर्भात विस्तृत माहिती देताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जन्मदिनी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे निधन झाल्याने यावेळी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा असा उपक्रम सुरू करण्याचा विचार मागील अनेक आठवड्यांपासून सुरू होता. त्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना दत्तक घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेचा लाभ शासकीय अनुदानास पात्र ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 208 शेतकऱ्यांची पत्नी, आई-वडील, मुले-मुली यांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, मुलींचा विवाह सोहळा, आरोग्य सुविधा आदी जबाबदाऱ्या विखे पाटील कुटूंब स्वीकारणार आहे. याशिवाय या 208 शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी आणि महिलांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी तसेच बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित शेतकरी कुटुंबाचे घर राहण्यास योग्य नसेल तर त्यांना घर दुरुस्तीसाठीही सहकार्य केले जाणार आहे. शिवाय या कुटुंबांचा अपघात विमा देखील काढला जाणार आहे. दिवंगत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी आयुष्यभर सर्वसामान्य शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना भक्कम आधार देण्याचा प्रयत्न केला. या योजनेच्या माध्यमातून हाच वसा आम्ही पुढे कायम ठेवणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
येत्या 15 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात संबंधीत 208 कुटुंबेही सहभागी होणार आहेत. सदरहू कुटुंबांचे मागील 2 महिन्यांपासून सर्वेक्षण सुरू होते. या कुटुंबांना मिळालेली शासकीय मदत पुरेशी नसल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. या कुटुंबांच्या हलाखीच्या परिस्थितीची तालुकानिहाय उदाहरणे डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांना सांगितली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. परंतु, तोवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी व नैतिक जबाबदारी म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आधार देणारी योजना व्यक्तीगत पातळीवर सुरू करण्याचे कदाचित हे देशातील पहिलेच उदाहरण असावे, असेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. याशिवाय पांगरमल येथील विषारी दारू कांडात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांनाही प्रत्येकी 25 हजार रूपयांची मदत दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकरी संपाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या प्रत्येक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी 27 जिल्ह्यात काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे या सरकारचे शेतकरी विरोधी धोरण चव्हाट्यावर आले आणि त्यातूनच शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होऊन आज राज्यभर आंदोलने होताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते या आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकले नाहीत. मागील आठवड्यापासून ते उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना 15 दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. संघर्ष यात्रेचा चौथ्या टप्प्यात त्यांना ही दुखापत झाली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ती गंभीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे विश्रांती घेणे अनिवार्य झाले होते, या शब्दांत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अनुपस्थितीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
वस्तुस्थिती जाणून न घेता विरोधी पक्षनेत्यांवर चिखलफेक करणाऱ्यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. विखे पाटील कुटुंबांच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा शेतकरी हाच केंद्रबिंदू राहिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री असताना प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आजवरच्या प्रत्येक अधिवेशनात आक्रमकपणे कर्जमाफीची मागणी लावून धरली. शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झाले. या पश्चातही त्यांच्यावर विनाकारण बिनबुडाची टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते योगदान दिले? असा प्रश्नही डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.