महापालिकेचा नालेसफाईचा पोकळ दावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2017

महापालिकेचा नालेसफाईचा पोकळ दावा

भारताची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख. मुंबई शहर हे महसूल विभागाच्या कोंकण विभागात येत असून या विभागात जास्त पाऊस पडतो. मुंबई शहराची निर्मिती ७ बेटांपासून झाली आहे. हे शहर बेटांपासून निर्माण झाल्याने या शहराच्या तिन्ही बाजूला समुद्र किनारा लाभला आहे. शहरात जास्त पाऊस पडल्यास समुद्रात पाणी सोडण्याशिवाय या शहराकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यातच मुंबईतील पाणी समुद्रात आणि खाडीत नेण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांमधून दरवर्षी गाळ आणि कचरा जमा होत असून या गाळाची कचऱ्याची योग्य सफाई होत नसल्याने मुंबईमध्ये अनेक वेळा पाणी साचण्याच्या घटना घडतात.


मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. हि नालेसफाई करताना नाल्यातील गाळ आणि कचरा काढण्यापेक्षा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची घरे कशी भरतील यासाठी करण्यात येते. दरवर्षी नालेसफाईवर १२० ते १५० कोटी रुपये खर्च केले जातात. इतका पैसे खर्च करूनही नालेसफाई होत नसल्याने पाऊस जोरात पडल्यास मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचते. याचा परिणाम म्हणून ट्रेन आणि वाहतूक सेवा ठप्प होऊन करदात्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. करदात्या नागरिकांचा पैसे चांगल्या कामासाठी खरंच होणे अपेक्षित असताना नालेसफाईच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचारातून हा पैसा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या खिश्यात जात आहे.

मुंबईमधील मोठे आणि छोट्या नाल्यांचा गाळ टाकण्यासाठी खाजगी डम्पिंग कंत्राटदाराने स्वतः पाहून त्यावर गाळ टाकण्याची सक्ती करण्यात आली आहे. वास्तविक पाहता महापालिकेने डम्पिंगची जागा नेमून त्यावर किती गाळ टाकला जात आहे यावर लक्ष ठेवायला हवे. असे न होता खाजगी डम्पिंग असल्याने त्यावर इतर शहरातील गाळ टाकला जात असल्याने नेमका मुंबईमधील गाळ किती याचे मोज माप करणे शक्य नाही. गाळ भरून शहराबाहेर किती गाड्या गेल्या हे व्हीटीएस प्रणाली योग्य प्रकारे वापरली जात नसल्याने कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना खिश्यात घालून बनवलेल्या पावत्यावरूनच गाळाची आकडेवारी ठरवली जाणार आहे. हा एक मोठा भ्रष्टाचाराच म्हणावा लागेल.

नालेसफाईमधील गाळ किती काढला याचा नेमका आकडा किती हे खात्रीलायक सांगितले जाऊ शकत नसल्याने मुंबई महापालिकेच्या एसडब्लूडी विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांचे चांगलेच फावत आहे. मागील वर्षी २०१५ च्या तुलनेत तब्बल ६१% जादा पाऊस होऊनही मुंबईत हिंदमाता, मिलन सबवे, सायन रोड क्र २४, मुख्याध्यापक नाला, नाना चौक, किंग्ज सर्कल अशा नेहमी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी साचले नव्हते. यंदाही या ठिकाणी आणि इतरत्र कोठेही शक्यतो पाणी साचू नये. साचल्यास कमीतकमी वेळेत त्याचा व्हावा निचरा व्हावा, अशा दृष्टीने तयारी करण्यात आलेलीआहे. यात अडचण येऊ नये असे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असा दावा महापालिकेने केला आहे.

मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा करताना मुंबईत २१९ ठिकाणी पाणी साचण्याची ठिकाणे असून या ठिकाणी पाणी साचल्यास ३१३ पापं लावले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिका ठामपणे नालेसफाई झाल्याचा दावा करू शकत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. नालेसफाई योग्य प्रकारे झाल्यास साचलेल्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन मुंबईत पाणी साचणार याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. मुंबई महापालिकेत दोन वर्षांपूर्वी नाले सफाईचा घोटाळा उघड झाल्यावही असे घोटाळे पुन्हा होऊ नये म्हणून पालिकेने म्हणावे तसे लक्ष दिलेले दिसत नाही. पालिकेने लक्ष दिले असते तर नालेसफाई चांगली झाली असती.

नालेसफाई चांगली झाली नसल्याचे विरोधी पक्ष नेत्यांचा आणि पत्रकारांच्या दौऱ्यात उघड झाले आहे. डेडलाईन संपली तरी नालेसफाई झाली नवहती हे सत्य आहे. पालिका प्रशासन हे सत्य नाकारत असताना खुद्द सत्ताधारी शिवसेनेच्या महापौरांनीही नालेसफाई बाबत चिंता व्यक्त केली होती. नालेसफाई योग्य झाली नाही तरी मुंबईत पाणी साचेल या चिंतेत नालेसफाईच्या शेवटच्या दिवसात महापौरांनी मुंबईबाहेर राहणे पसंत केले. मुंबई महानगर पालिकेच्या नालेसफाईच्या एसडब्लूडीच्या मुख्य असलेल्या संचालकांनी व अधिकाऱ्यांनी या कार्यकाळात सुट्टीवर राहणे पसंत केले आहे. यामुळे नालेसफाईच्या कामावर किती चांगल्या प्रकारे देखरेख ठेवण्यात आली असेल याचा विचार न केलेलाच बरा.

एकीकडे महापालिका प्रशासन नालेसफाई चांगली झाल्याचा दावा करत आहे. दुसरीकडे नगरसेवक नालेसफाई योग्य होत नसल्याने चिंता व्यक करत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी नालेसफाईचा भांडाफोड केला आहे. सत्तेतील महापौरांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनावर भरोसा नसल्याने महापौरांनी सुट्टीवरून परतल्यावर पुन्हा एकदा नालेसफाईची पाहणी केली आहे. परंतू १०० टक्के नालेसफाई होऊन पाणी साचणानारच नाही असा मुंबईकरांना दिलेला नाही. मुंबईचे पाहारेकरी म्हणून उदयास आलेल्या भाजपाने नालेसफाईवर संतुष्ट नसल्याचे म्हटले आहे. यावरून मुंबई महापालिकेने नालेसफाईच्या केलेला दावा हा पोकळ ठरण्याची चिन्ह दिसत आहेत. पालिकेचा हा दावा पोकळ ठरणार असल्याने मुंबईकर नागरिकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

Post Bottom Ad