मुंबईतील मॉलमध्ये स्तनपानासाठी जागा द्या - डॉ. भारती बावधने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील मॉलमध्ये स्तनपानासाठी जागा द्या - डॉ. भारती बावधने

Share This

मुंबई - मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात नोकरीवर जाणाऱ्या महिलांची किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या महिलांची संख्या जास्त असताना स्तनपनासाठी जागा नसल्याची बाब समोर आली आहे. मुंबईतल्या एका मॉलमध्ये स्तनपान देणाऱ्या, पण अवघडल्या अवस्थेत असलेल्या महिलेला पाहिल्यावर मॉलमध्ये लहान बाळांना घेऊन जाणाऱ्या महिलांना स्तनपानासाठी एक खोली किंवा जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

ऑस्ट्रेलियन सिनेटर लॅरी वॉटर्स यांनी नुकतंच तिथल्या संसदेत आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला स्तनपान देत कामकाजात सहभाग घेतला. याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आणि सर्व थरातून त्यांच कौतुक झालं. एकीकडे सार्वजनिकरित्या स्तनपान करण्यासाठी जगात चळवळ उभी राहत असताना भारतात या साध्या गरजेसाठी सरकार किंवा महापालिका प्रशासनाकडे जाण्याची वेळ आली असल्याची खंत बावधने यांनी व्यक्त केली आहे.

आज प्रगत देशात या गोष्टीचं कौतुक होत असताना मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात महिलांना सार्वजनिकरित्या स्तनपान देणं कठीण जातं. महाराष्ट्रात एसटी महामंडळाने स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार केले. पण मुंबईत मॉलसारख्या ठिकाणी अशी सुविधा नाहीत. महिलांना आडोसे शोधावे लागतात किंवा शौचालयात आडोश्याला जावं लागतं. स्तनपान ही बाळाची आणि आईची अत्यंत महत्वाची गरज आहे. वेळेत स्तनपान न दिल्यास फक्त बाळाची गैरसोय होत नाही तर आईच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात, असं असताना मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्तनपानासाठी एका वेगळ्या खोलीची जागेची गरज असल्याची मागणी बावधने यांनी केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages