साथरोग आजारांवर उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणांनी जागृतीवर भर द्यावा - डॉ. दीपक सावंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 June 2017

साथरोग आजारांवर उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणांनी जागृतीवर भर द्यावा - डॉ. दीपक सावंत


मुंबई, दि. २९ : मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून येत असून पावसाळ्यामध्ये स्वाईन फ्ल्यूसह डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेतली. यावेळी साथरोग आजारांवर उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणांनी जागृतीवर भर द्यावा असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यात १ जानेवारी २०१७ ते २७ जून २०१७ या कालावधीत सुमारे ७५८१ स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ७२० रुग्ण बाधीत आढळले असून आतापर्यंत २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्य शासनाच्यावतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावर्षी जानेवारी ते जून या काळात ३० हजार ४६२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. स्वाईन फ्ल्यूच्या प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून ऑसेलटॅमीवीर हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

स्वाईन फ्ल्यूच्या नियंत्रणासाठी फ्ल्यू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपचाराची सुविधा असणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्ल्यू उपचाराची मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील ४ शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदानाची सुविधा करण्यात आली आहे. रेलीगेअर आणि डॉ.लाल पॅथॉलॉजी लॅबसह अन्य १७ खासगी प्रयोगशाळांना स्वाईन फ्ल्यूच्या निदानाची मान्यता देण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खासगी डॉक्टरांनी फ्ल्यूच्या रुग्णांवर लक्षणे सुरु झाल्यास दोन दिवसात स्वाईन फ्ल्यूचे उपचार सुरु करुणे आवश्यक आहे. त्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गरोदर माता अशा अतिजोखमीच्या गटाकडे विशेष लक्ष द्यावे. पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेता जनजागृतीवर भर द्यावा. खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

जुलै महिन्यापासून प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला गती द्यावी. शाळांमधून विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूबाबत जाणीव जागृतीचे धडे द्यावेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.यावेळी केंद्र शासनाच्या शीघ्र प्रतिसाद समितीचे संकेत कुलकर्णी यांनी मुंबई, ठाणे, पुणे येथील स्वाईन फ्ल्यूबाबतचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर केला. फ्ल्यूचे रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा येतात व त्यांच्यावर उशीरा उपचार होतात, असे या अहवालात म्हटले आहे. यावेळी लेप्टोस्पायरोसिस आजाराबाबतचाही आढावा घेण्यात आला. बैठकीस साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष साळुंखे, आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार, सह संचालक डॉ.प्रदीप आवटे आदी उपस्थित होते.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS