पहिल्या तिमाहीत महापालिका अर्थसंकल्पातील १२.६० टक्के रक्कम खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 July 2017

पहिल्या तिमाहीत महापालिका अर्थसंकल्पातील १२.६० टक्के रक्कम खर्च


मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प ३७ हजार कोटी वरून १२ हजार कोटींची कपात करत २५ हजार कोटीपर्यंत खाली आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाही दरम्यान अंदाजित खर्चाच्या ४.४९ टक्के एवढीच रक्कम खर्च झाली होती. यामुळे मागील वर्षापर्यंत बजेटमधील रक्कम खर्च होत नाही अशी बोंब होती. यावर्षी बजेटचा आकडा कमी झाला असताना पालिकेने अंदाजित खर्चाच्या १२.६० टक्के एवढी रक्कम खर्च करण्यात आल्याचा दावा केला आहे. यावर्षी अंदाजित खर्चाची एकूण रक्कम ही रुपये ८,१२७.०८ कोटी रुपये एवढी असून यापैकी रुपये १,०२४.३३ कोटी रकमेचा विनियोग करण्यात आल्याचे पालिकेने कळविले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतूदींच्या अंदाजातील खर्च विषयक बाबींची बहुतांश अंमलबजावणी ही आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत अधिक होत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे अर्थसंकल्पीय तरतूदींचा परिणामकारक विनियोग करण्यावर मर्यादा येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेचा अर्थसंकल्पीय अंदाज वस्तुनिष्ठपणे तयार करणे व अर्थसंकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतानाही नियोजनबद्ध कार्यक्रम व सर्वंकष संनियंत्रण करण्याबाबत आमूलाग्र सुधारणा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेच्या संबंधित खात्यांना दिले होते.

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच १ एप्रिल ते ३० जून २०१६ या कालावधीत अर्थसंकल्पीय अंदाजातील एकूण अंदाजित खर्चापैकी म्हणजेच रुपये १२,९५७.८३ कोटींपैकी ४.४९ टक्के म्हणजेच रुपये ५८१.८६ कोटी एवढीच रक्कम प्रत्यक्ष खर्च झाली होती. चालू आर्थिक वर्षात रुपये ८,१२७.०८ कोटी एवढा अंदाजित खर्च आहे. यापैकी १२.६० टक्के म्हणजेच रुपये १०२४.३३ कोटी एवढ्या रकमेचा विनियोग पहिल्या तिमाहीत म्हणजेच १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत करण्यात आला आहे. याचाच अर्थ यावर्षी ही रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक आहे. आर्थिक वर्ष २०१७ – १८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजातील खर्च विषयक तरतुदींमध्ये रस्ते व वाहतूक खात्यासाठी यावर्षी रुपये १,०९४.८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी २३.१७ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग पहिल्या तिमाहीत करण्यात आला आहे. गेल्यावर्षी हीच टक्केवारी केवळ ०.३० टक्के होती. पुलांसाठी असणा-या तरतुदींपैकी गेल्यावर्षी ३.६० टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती. यावर्षी हीच टक्केवारी २०.४१ एवढी आहे.

पर्जन्यजल वाहिन्या खात्यासाठी यावर्षी रुपये ४७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ४९.७० टक्के एवढी रक्कम पहिल्या तिमाहीत खर्च झाली आहे. गेल्यावर्षी हीच टक्केवारी ११.२९ एवढी होती. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसाठी यावर्षी रुपये १९०.४८ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ४२.७४ टक्के एवढी रक्कम पहिल्या तिमाहीत खर्च झाली आहे. गेल्यावर्षी हीच टक्केवारी ११.०१ एवढी होती. जल अभियंता खात्यासाठी यावर्षी रुपये ६०६.३६ कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. यापैकी १५.७८ टक्के एवढी रक्कम पहिल्या तिमाहीत खर्च झाली आहे. गेल्यावर्षी हीच टक्केवारी ८.७५ एवढी होती. याचप्रमाणे इतर खात्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधील खर्च विषयक विनयोगात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी खर्च विषयक तरतुदींचा १०० टक्के विनियोग करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Post Bottom Ad