पोलिसांमुळे रमजानच्या पवित्र महिन्यात शांततेचे वातावरण - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2017

पोलिसांमुळे रमजानच्या पवित्र महिन्यात शांततेचे वातावरण - मुख्यमंत्री


मुंबई, दि. ५ : पोलिसांचे उत्कृष्ट काम आणि समाजाचे सहकार्य यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यासह ईदचा सण राज्य आणि देशात शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात साजरा करण्यात आला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मुंबई पोलीस दलाच्या वतीने ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री मार्गदर्शन करत होते.

रमजानच्या पवित्र महिन्यात संपूर्ण राज्यात तसेच देशात शांततेचे, बंधुभावाचे वातावरण राहिले,असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या काळात पोलीस दलाने खूपच चांगले काम केले. आपण सर्वजण मिळून शांततेने ईदचा सण साजरा करतो. मात्र, ज्यांना जात- धर्म नसतो असे काही थोड्या प्रमाणातील लोक समाजात वितुष्ट आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्यावर नियंत्रणासाठी पोलिसांची आवश्यकता भासते. हे काम पोलिसांनी उत्कृष्ट केले. यासाठी समाजानेही खूप चांगले सहकार्य केले.

फडणवीस म्हणाले की, ‘सबका साथ सब का विकास’ यानुसार आपले शासन काम करत आहे. अल्पसंख्याकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. नुकताच उच्च शिक्षणामध्ये शासकीय व खासगी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे 50 टक्के शुल्क राज्य शासनाच्या वतीने भरण्याचा निर्णय घेतला. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य शासन समाजाच्या विकासासाठी नेहमीच पाठीशी राहील अशी ग्वाहीदेखील यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

याप्रसंगी आमदार अमिन पटेल, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर खासदार अरविंद सावंत, आमदार अस्लम शेख, अरिफ नसीम खान, राज पुरोहित, अबू आझमी, वारीस पठाण उपस्थित होते.

Post Bottom Ad