मुंबई, दि. 5 - सार्वजनिक स्थळावर ध्वनीक्षेपक किंवा ध्वनीवर्धक यंत्रणाचा वापर करताना ध्वनीप्रदूषण नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले. ते आज ध्वनीप्रदूषण संदर्भात सुधारित नियम व आदेशाची माहिती देताना पत्रकारांशी बोलत होते.
कदम पुढे म्हणाले की, सार्वजनिक स्थळावर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणांचा आवाज हा त्या क्षेत्रासाठी निश्चित केलेल्या मानकापेक्षा 10 डेसिबलच्या मर्यादेत किंवा 75 डेसिबल यापैकी कमी असलेला असावा. रुग्णवाहिकांमधील हॉर्न, भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा नॅशनल ॲम्ब्युलन्स कोडमध्ये नमूद केल्यानूसार 110 ते 120 डेसिबलच्या मर्यादेत असावी. नवीन सुधारित नियमानुसार प्रत्येक वाहनाकरिता त्या वाहनाच्या प्रकारानुसार ठरवून दिलेल्या इंजिनाच्या ध्वनीची पातळी 10 डेसिबल पेक्षा जास्त ध्वनीमर्यादा उल्लंघन न करणारे हॉर्न्स बसविणे बंधनकारक आहे. आपत्कालीन सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरील सायरनची मर्यादा नॅशनल अँम्बुलन्स कोडमध्ये नमूद केल्यानुसार 110 ते 120 डेसिबल असावी, असेही कदम यांनी शेवटी सांगितले.