मुंबईत क्षयरोग्यांची संख्या वाढल्याने पालिकेचे विशेष तपासणी अभियान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2017

मुंबईत क्षयरोग्यांची संख्या वाढल्याने पालिकेचे विशेष तपासणी अभियान


मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत सन २०१२ - १३ मध्ये क्षयरोगाचे ३६ हजार ४१७ रुग्ण होते. सन २०१६ - १७ मध्ये त्यात वाढ होऊन ५० हजार रुग्ण सापडले आहेत. मुंबईत क्षयरुग्णांची संख्या वाढली असून दिवसाला क्षयरोगाने दररोज १८ लोकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी प्रजा फाऊंडेशन नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेतून उघड करण्यात आली आहे. या जाहीर केलेल्या आकडेवारी नंतर पालिकेने क्षयरोग्यांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष तपासणी अभियान महापालिकेद्वारे राबविण्यात येणार आहे. या तपासणी अंतर्गत साधारणपणे ९ लाख लोकांची तपासणी होणार आहे. मुंबईकर नागरिकांनी महापालिकेच्या क्षयरोग तपासणी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे.

क्षयरोग नियंत्रणाचा महत्त्वाचा भाग म्हणून सर्वेक्षण पद्धतीनुसार नागरिकांची क्षयरोग विषयक तपासणी महापालिकेद्वारे नियमितपणे केली जाते. या अंतर्गत गेल्या वर्षी म्हणजेच १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान १७ लाख ९२ हजार ३०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. याचप्रमाणे यावर्षी देखील नियमित स्वरुपात तपासणी करण्यात येत आहे. तथापि, दि. १ ते १५ ऑगस्ट २०१७ दरम्यान 'Active Case Finding' (ACF Phase – II) हे विशेष तपासणी अभियान महापालिकेद्वारे राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या ७० परिसरांमधील साधारणपणे १ लाख ९२ हजार १५४ घरातील सुमारे ९ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी अभियानासाठी महापालिकेच्या ३२७ चमू कार्यरत राहणार आहेत. या चमूत त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्याने सायंकाळी ४ ते ८ या वेळेत भेटी देऊन क्षयरोग विषयक वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तथापि, घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास ही चमू दिवसातील इतर वेळी देखील भेटी देऊ तपासणी करेल, अशी माहिती डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी (क्षयरोग) डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणी दरम्यान आढळणा-या संशयित रुग्णांची बेडक्याची तपासणी ही त्या परिसराच्या जवळपास असणा-या सरकारी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तर क्ष-किरण चाचणी ही निर्धारित करण्यात आलेल्या खाजगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत केली जाणार आहे. यासाठी संशयित रुग्णाला विशेष 'व्हाऊचर' देण्यात येणार आहे. ज्यामुळे संशयित रुग्णाला निर्धारित करण्यात आलेल्या खाजगी क्ष-किरण केंद्रामध्ये जाऊन ही चाचणी मोफत करुन घेता येणार आहे. या अभियानादरम्यान क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. या अभियानासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्यात येत आहे, अशीही माहिती डॉ. शहा यांनी दिली आहे.

Post Bottom Ad