मुंबई / प्रतिनिधी - नवी मुंबई पनवेल सेक्टर ७ येथील सेंट जोसेफ शाळेमधील विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररित्या जास्त फी घेतली जात होती. याबाबत दोन वेळा उपोषण करूनही शाळेवर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने गुरुवारी या शाळेतील शेकडो पालक आणि विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानात थडकले. यावेळी आमदार बच्चू कडू पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर काढलेल्या मोर्चानंतर आमच्या मागण्यांची दखल घेण्यात आली असून मागण्या मान्य करण्यात आल्याचे पालकानी सांगितले आहे.
सेंट जोसेफ हायस्कुलच्या पालक, विद्यार्थ्यांनी २००७ ते २०१४ पर्यंत बेकायदेशीररित्या घेतलेली जास्त फी परत करावी, उपसंचालक शिक्षण विभाग यांच्या आदेशानुसार शाळेचा अल्पसंख्यांक दर्जा त्वरित काढावा, बालसंरक्षण कक्षाने खांदेश्वर पोलीस स्टेशन, यांना दिलेल्या निर्देशानुसार शाळा प्राशसान व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ नुसार शिक्षण उपसंचालकांनी पालकांना व पोलिसांना शाळेविरोधात एफआयआर दाखल करण्याची परवानगी द्यावी इत्यादी मागण्यांसाठी आज गुरुवारी मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार बच्चू कडू यांनी केले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पालक आणि विद्यार्थी थेट विधानभवनात पोहचले. यावेळी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेण्यात आली. या भेटी दरम्यान शिक्षण मंत्र्यांनी सर्व मागण्यांची दाखल घेत ५ आमदारांची समिती स्थापन करून ७ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे तसेच शाळेचा अल्पसंख्यांक दर्जा २ दिवसात काढून घेण्याचे आश्वासन दिल्याचे पालकांनी सांगितले