टुरिझम पोलीस संकल्पना राबविण्यासाठी आराखडा तयार करावा - दीपक केसरकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टुरिझम पोलीस संकल्पना राबविण्यासाठी आराखडा तयार करावा - दीपक केसरकर

Share This

मुंबई, दि. २० : राज्यातील सागरी किनारी जिल्ह्यामध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांना सहाय्य व्हावे, यासाठी टुरिझम पोलिस ही संकल्पना राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी मॉडेल तयार करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिले. 

सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा आज केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश शेठ, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक उपस्थित होते.

किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात देशातील तसेच परदेशातील पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षे संदर्भात योग्य पावले उचलण्याचे निर्देश देऊन केसरकर म्हणाले, सागरी किनारपट्टी पोलीसांना लाईफ जॅकेट, बोटी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. सागरी बीचवर येणाऱ्या पर्यटकांना सहाय्य करण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी टुरिझम पोलीस ही संकल्पना राबविण्यात यावी. यासंबंधी या पोलिसांना विशेष कौशल्य प्रशिक्षण कोकण ग्रामीण विकास पर्यटनाच्या माध्यमातून देता येईल. त्यासाठी स्थानिक पातळीवरील आराखडा तयार करावे. सागरी पोलिसांना समुद्रामध्ये १२ मैलपर्यंत कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी. तसेच छोटे आणि मोठे मच्छिमार यांच्यासंदर्भात योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देशही केसरकर यांनी यावेळी दिले. तसेच किनारपट्टीवर तसेच समुद्रामध्ये टेहळणीसाठी ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणेवरील प्रणाली वापरण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देशही केसरकर यांनी यावेळी दिले.

सागरी किनाऱ्यावर समुद्रात बुडण्यासारखे अपघात टाळण्यासाठी अशा ठिकाणी असलेल्या जीवरक्षकांबरोबर पोलिसांनी समन्वय ठेवावे. एखाद्या आपत्कालीन घटनेच्या वेळी पोलिसांना तातडीने संपर्क साधण्यासाठी जीवरक्षकाजवळ अत्याधुनिक यंत्र देता येईल का. याचाही विचार करावा. तसेच सागरी किनाऱ्यावर गुन्हे घडू नयेत, गुन्हेगारी विषयक घटनांवर, अमली पदार्थ माफिया यांच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवावे व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच पर्यटकांच्या दृष्टीने सागरी किनारा सुरक्षेसंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मॉडेल तयार करावे. हे मॉडेल इतर जिल्ह्यांनाही लागू करण्यात येईल, असेही केसरकर यांनी सांगितले. किनारपट्टीच्या जिल्ह्यात भू माफिया, अवैध मद्य वाहतूक व विक्री, अमली पदार्थ विक्री यांच्यावर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केसरकर यांनी केल्या.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages