मुंबई, दि. 26 : खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूमुळे होणाऱ्या मृत्यूचे संशोधन करण्यासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात 5 सदस्यीय समिती नियुक्त करावी. या समितीमार्फत स्वाईन फ्ल्युमुळे मृत्यूची निश्चिती समिती करेल. त्याबरोबराच संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे देखील संशोधन समितीने करावे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले.
ठाणे, पुणे यासह राज्यातील अन्य भागांमध्ये स्वाईन फ्ल्युचा प्रादुर्भाव वाढतो आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्र्यांनी विधानभवनात त्यांच्या दालनात बैठक घेतली. यावेळी आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख, आमदार संजय केळकर, विजय काळे, आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास, संचालक डॉ. सतीश पवार उपस्थित होते.
राज्यात गेल्या 7 महिन्यात स्वाईन फ्ल्युमुळे 338 मृत्यू झाले आहे. त्यातील 5 जण राज्याबाहेरचे आहेत. सर्वाधिक मृत्यू नाशिक येथे झाले असून त्यांची संख्या 37 एवढी आहे. त्याखालोखाल पुणे महापालिका क्षेत्रात 31 तर ग्रामीण क्षेत्रात 23 मृत्यू झाले आहेत. नागपूर व औरंगाबाद येथे प्रत्येकी 24, ठाणे येथे 21, पिंपरी चिंचवड, अहमदनगर येथे प्रत्येकी 20, मुंबई 15, अमरावती13, अकोला, कोल्हापूर येथे प्रत्येकी 10, सातारा, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 9 , सोलापूर येथे 8, बुलढाणा, लातूर येथे प्रत्येकी 7, रत्नागिरी, मिरा-भाईंदर, वसई-विरार प्रत्येकी 4, परभणी, सांगली, उस्मानाबाद, नवी मुंबई, रायगड येथे प्रत्येकी 3, बीड, धुळे,वाशिम, जळगाव, पालघर, जालना येथे प्रत्येकी 2 तर हिंगोली, वर्धा, चंद्रपुर, यवतमाळ, सिंधूदुर्ग,भंडारा, उल्हासनगर महापालिकाक्षेत्रात प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे. अन्य 5 मृत्युमध्ये कर्नाटक येथील 2 तर मध्य प्रदेश येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.
अतिजोखमीच्या अशा 31 हजार व्यक्तींचे लसीकरण
राज्यात सध्या 3181 बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 2036 रुग्ण हे जून आणि जुलै या दोन महिन्यात आढळून आले आहे. या दोन महिन्यात 108 मृत्यू झाले असून त्यातील 56 मृत्यू मुंबई,ठाणे परिसरातील आहे. राज्य शासनाने स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गेल्या 7 महिन्यात अतिजोखमीच्या अशा 31 हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचा सर्व्हे करुन
संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांच्या माहितीचे वर्गीकरण करावे
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, ठाणे, पुणे महापालिका क्षेत्रातील तसेच ज्या भागात स्वाईन फ्ल्युचा प्रादुर्भाव जाणवत आहे अशा ठिकाणच्या प्रत्येक खाजगी रुग्णालयाचा प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व्हे करावा. त्यामध्ये संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची माहिती घेऊन त्याचे वर्गीकरण करावे. ठाणे आणि पुणे येथे हा सर्व्हे सक्तीचा करण्यात आला असून राज्य शासनाच्या आरोग्य विभागासोबतच महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने या संदर्भात कार्यवाही करावी, असे डॉ.सावंत यांनी सांगितले.
डेंग्यू, मलेरिया सदृश आजाराच्या रुग्णांचे मॅपिंग करावे
तापाच्या रुग्णांसंदर्भात तसेच डेंग्यू, मलेरिया सदृश आजाराच्या रुग्णांचे मॅपिंग करावे. बाधित रुग्ण वाढण्यामागील कारणांचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने संशोधन करावे. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्युमुळे होणाऱ्या मृत्यूची निश्चिती करण्यासाठी सर्व महापालिका क्षेत्रात संशोधन समिती तातडीने नियुक्त् करावी. त्यामध्ये आरोग्य उपसंचालक अथवा त्यांचा प्रतिनिधी, महापालिका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रतिनिधी, खासगी वैद्यकीय व्यवसायिकांचा प्रतिनिधी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट अशा 5 सदस्यीय संशोधन समितीची रचना असावी, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. संसर्गजन्य आजाराच्या मृत्युचा अहवाल देखील स्थानिक आमदारांना15 दिवसातून द्यावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्युच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करावा
खासगी रुग्णालयात मंजूर खाटांच्या 2 ते 3 टक्के खाटा राखीव करुन स्वाईन फ्ल्युच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करावा. व्हेंटीलेटर वापराबाबत प्रोटोकॉल करुन त्याचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.