
पालिकेच्या बालवाड्यांचा कायापालट केला जाणार -
मुंबई / प्रतिनिधी - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी या वर्षी तब्बल ३९६ बालवाड्या नव्याने सुरु करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. यामुळे पालिका बालवाड्यांची संख्या ९०० होईल. यामुळे खाजगी बालवाड्यांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळेल, असा दावा पालिकेने केला आहे.महापालिका क्षेत्रात सर्व भागांमध्ये महापालिकेच्या शाळा आहेत. मात्र या शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या बालवाड्यांची संख्या कमी असल्याने मुले खाजगी बालवाड्यांकडे वळतात. परिणामी भविष्यातील मनपा शाळांच्या प्रवेशावरही याचा परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन या वर्षी तब्बल ३९६ बालवाड्या सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ही बाब लक्षात घेऊन या वर्षी तब्बल ३९६ बालवाड्या सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या महापालिकेच्या ५०४ बालवाड्या सुरु असल्याने ही संख्या आता ९०० एवढी होईल, अशी माहिती पालिका उपायुक्त मिलीन सावंत यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांतर्गत सर्वाधिक म्हणजे ८६ बालवाड्या या 'एल' विभागात असून याच विभागात आणखी २५ बालवाड्या सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने या विभागात बालवाड्यांची संख्या आता १११ एवढी होणार आहे. तर 'एफ उत्तर' विभागात सर्वाधिक म्हणजे ४० एवढ्या नवीन बालवाड्या सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्यामुळे 'एफ उत्तर' विभागातील बालवाड्यांची एकूण संख्या ७२ एवढी होणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या सर्व बालवाड्यांना चिमुकल्यांना आवडतील अशी रंगरंगोरटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पशु-पक्षी, डोंगर-नदी, हिरवी झाडे, फळे-फुले, सूर्य-चंद्र-तारे यासारख्या निसर्गातील चित्ताकर्षक बाबींसोबतच लहानग्यांचे आवडते कार्टुन्स, मोठ्या प्रमाणात आकर्षक खेळणी देखील मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिली.