मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत गेल्या ५ वर्षात डेंग्यूचा प्रभाव २५६ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल नुकताच प्रजा फाउंडेशनने जाहीर केला आहे. त्याच प्रमाणे मलेरिया आणि स्वाईन फ्लूचे रुग्णही मुंबईत मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गेल्या सडे सहा महिन्यात डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या 'एडिस एजिप्ती' व 'ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' या डासांच्या आळ्या भेटलेल्या ८ हजार ७४४ लोकांना नोटिसा देण्यात आल्या असून २० लाख ४ हजार ६०० रुपये एवढा दंड महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे वसूल करण्यात आला आहे अशी माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.
डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या आजारांना आळा बसावा म्हणून पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यासाठी घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येते. या तपासणीमध्ये १ जानेवारी ते १५ जुलै २०१७ या साडे सहा महिन्यांच्या कालावधी ७ हजार ५८६ ठिकाणी 'एडिस एजिप्ती' (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणा-या डासांच्या अळ्या; तर २ हजार ६७४ ठिकाणी मलेरिया वाहक'ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' (Anopheles stephensi) डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. ही सर्व उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत. या कालावधी दरम्यान डेंग्यू नियंत्रणाच्या दृष्टीने ६२ लाख ४३ हजार ५९७ गृहभेटी देखील देण्यात आल्या. यामध्ये काही घरांना गरजेनुरुप एकापेक्षा अधिक वेळा भेटी देण्यात आल्या, त्या घरांचाही या संख्येत समावेश आहे. अशी माहिती नारिंग्रेकर यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱया`एडीस इजिप्टाय' डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या स्वच्छ पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू शक्य त्वरीत नष्ट कराव्यात. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळावा. तसेच मलेरियाच्या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी' डासाची उत्पत्ती विहीरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे,कूलींग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाणी इत्यादी ठिकाणी स्वच्छ पाण्यात होते. अश्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याने केले आहे.