बाल व महिला कॅन्सर रूग्‍णालयासाठी विशेष अधिकारी नियुक्त करणार - चंद्रकांत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 July 2017

बाल व महिला कॅन्सर रूग्‍णालयासाठी विशेष अधिकारी नियुक्त करणार - चंद्रकांत पाटील


मुंबई, दि. २७ : परळ येथील हाफकिन संस्थेची जागा टाटा मेमोरियल सेंटरच्या बाल व महिला कॅन्सर रूग्‍णालय आणि रेडिओ थेरपी सेंटरसाठी देण्यात आली आहे. हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून, हा प्रकल्प सुरू करण्यासाठीची मुदत वाढविण्यात येणार आहे. या सेंटर उभारणीसाठीची कामे तातडीने सुरू व्हावीत यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रश्नोत्तराच्या तासात परळ मुंबई येथील हाफकिन संस्थेची पाच एकर जागा टाटा मेमोरियल सेंटरला दिल्याबाबत सदस्य दत्तात्रय भरणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी उप प्रश्नांना उत्तर देताना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले, रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने ही जागा टाटा सेंटरला दिली असून, लवकरच हे सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासकीय निमशासकीय सेवेतील कर्करोग पीडित कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात उपचारासाठी ५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

तसेच, टाटा मेमोरियल सेंटरला देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या हाफकिन संस्थेच्या जागेमध्ये संस्थेतील अधिका-यांची निवासस्थाने, विद्यार्थ्यांच्या खोल्या, अतिथीगृहे व वर्ग ४ च्या कर्मचा-यांसाठी निवासस्थाने येत असल्याने पर्यायी इमारती बांधण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर ५ कोटी रूपये देणार असल्याची माहितीही श्री. राठोड यांनी दिली. यावेळी सदस्य पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे पाटील, मंगलप्रभात लोढा, अजय चौधरी, राज पुरोहित यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

Post Bottom Ad