दोषी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा - आशा मराठे
मुंबई / प्रतिनिधी - चेंबूर स्वस्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटी येथील नारळाचे झाड अंगावर पडल्याने एका योग शिक्षिका गुरुवारी सकाळी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर सुश्रुत या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच शनिवारी सकाळी या महिलेचा मृत्यू झाला आहे. पालिकेकडे या धोकादायक झाडाची तक्रार करूनही याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये पालिकेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि चेंबूर स्वस्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटीत जुने नारळाचे होते. हे झाड कधीही कोसळू शकते अशी भीती येथील नागरिकांना होती. रहिवाशांनी पालिकेच्या एम पश्चिम विभागाकडे यासंदर्भात 17 जुलै 2017 ला तक्रार दिली होती. तसेच झाड कापण्यासाठी पालिकेच्या नियमानुसार 1380 रुपयांचे शुल्कही भरले होते. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे झाड चांगल्या स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र दिले. गुरुवारी सकाळी याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या कांचन नाथ (58) या गुरुवारी सकाळी योगा क्लासवरून घरी परतत असताना हे झाड त्यांच्या अंगावर पडले. यात त्या जखमी झाल्याने त्यांना बाजूच्याच सुश्रुत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी शनिवारी सकाळ पर्यंत मृत्यूशी झुंज दिली. मात्र कांचन यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी कांचन यांचा मृत्यू झाला आहे. या सोसायटीमधील रहिवाश्यांनी व कांचन नाथ यांचे पती रजत नाथ यांनी या दुघर्टनेला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी झाड चांगले असल्याचा खोटा अहवाल दिल्याचा आरोप रहिवाश्यानी केला आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी -
महापालिकेकडे तक्रार करूनही झाड कापले गेले नाही. महापालिकेने या प्रकरणी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे. पालिका अधिकऱ्यांच्या निष्काळजी पणामुळेच कांचन नाथ यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- आशा मराठे, नगरसेविका - भाजपा