ईव्हीएम मशीनमध्ये घोळ - निवडणूक निर्णय अधिका-यांची माहिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ईव्हीएम मशीनमध्ये घोळ - निवडणूक निर्णय अधिका-यांची माहिती

Share This
मुंबई - ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ईव्हीएम मशीन घोळ सिद्ध करण्याचे आवाहन केले होते. यावेळी मतदान यंत्रात छेडछाड करता येऊच शकत नाही असे सांगत निवडणूक आयोगाने आपली पाठ थोपटून घेतली होती. मात्र बुलढाणा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 करीता सुलतानपूर येथील मतदान केंद्रात नारळ बटनासमोरील लाईट न लागता कमळ बटनसमोर एलईडी लाईट लागत असल्याचा चौकशी अहवाल निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिला असल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिनांक 20 जून 2017 रोजी अपक्ष उमेदवार आशाताई अरुण झोरे यांनी केलेली तक्रार आणि त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सादर केलेल्या अहवालाची माहिती मागितली होती. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्वाचन विभागाने अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी बुलढाणा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 करीता सुलतानपूर 57/6 या मतदान केंद्रात उमेदवार क्रमांक 1 च्या नारळ बटनासमोरील लाईट न लागता उमेदवार क्रमांक 4 यांच्या कमळ बटनसमोर एलईडी लाईट लागत असल्याची तक्रार सकाळी 10 वाजता केली. प्रथम तक्रार निरर्थक समजून मतदान अधिकारी यांनी दुर्लक्ष केले त्यानंतर दीडच्या दरम्यान परत अन्य मतदाराने तक्रार करताच केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी उमेदवार प्रतिनिधींच्या संमतीने खात्री केली असता मतदान अधिकारी माणिकराव बाजड यांस तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानंतर केंद्राध्यक्ष रामनारायण सावंत यांनी निरीक्षण केल्यानंतर सदर बाब निवडणूक निर्णय अधिकारी, लोणार यांच्या निदर्शनास आणली.

वारंवार होणा-या तक्रारीनंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, लोणार यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेट दिली. मतदार नोंदवहीतील अनुक्रमांक 333 या मतदारास दोन्ही निवडणूकीचे बैलेट दिल्यानंतर जिल्हा परिषदेकरिता बैलेट वरील ज्या उमेदवारास मतदान करावयाचे होते त्याचे संबंधित निशाणी समोरील बटन दाबल्यनंतर अचुक उमेदवाराच्या निशाणीसमोरील एलईडी लाईट न लागता अन्य उमेदवार अनुक्रमांक 4 वरील उमेदवार यांचे नावासमोरील कमळ निशाणीचे एलईडी लाईट लागल्याची व चुकीचे उमेदवारास मतदान होत असल्याची बाब मतदाराने निदर्शनास आणून दिली आणि त्याबाबतची खात्री मतदान केंद्राध्यक्ष व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.

ईव्हीएम मशीनमधील घोळ लक्षात घेत 57/6 सुलतानपुर गटाचे कंट्रोल युनिटवरील मतदान बंद करत ते सीलबंद केले तदनंतर राखीव असलेल्या नवीन ईव्हीएम मशीनमध्ये मतदान नोंदविलेल्या मतदारांना मतदान योग्य रीतीने होत असल्याबाबतची खात्री करुन घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी, लोणार यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, बुलढाणा यांस पाठविला. तसेच मतदान केंद्र क्रमांक 57/6 मध्ये फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आणि 21 फेब्रुवारी 2017 राजी फेरमतदान सुद्धा घेण्यात आले. अनिल गलगली यांच्या मते सदर तक्रार उमेदवार आणि मतदार यांनी केल्यानंतर निदर्शनास आली आणि तक्रारीत तथ्य सुद्धा आढळले आहे. ईव्हीएम मशीनमधील घोळ हा निवडणूक अधिका-यांनी सादर केलेल्या अहवालावरुन सिद्ध झाले असल्याने भविष्यात अश्याप्रकारच्या घोळवर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने योग्य पाऊले उचलत दक्षता घ्यावी आणि ईव्हीएम मशीनचा नवीन पर्याय निवडावा.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages