
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेचा महत्वकांक्षी असलेला मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर पासून सुरु होणार आहे. कोस्टल रोडचे काम सुरु होण्या आधीच या सागरी रस्त्याला "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आली होती. तसा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सादर करण्यात आला असता सर्व पक्षीय गटनेत्यांनी एकमताने या नावाला मंजुरी दिली आहे अशी माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. कोस्टल रोड बांधण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून दिले होते. पालिका निवडणूकीनंतर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर कोस्टल रोडला लवकरात लवकर कशी सुरुवात होईल यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्नात होते. याबाबत स्थायी समितीत प्रस्ताव आल्यावर सादरीकरणाची मागणी करण्यात आली होती. या सादरीकरणा दरम्यान कोस्टल रोडचे काम सुरु होणार असल्याचे कळताच शिवसेनेने या कोस्टल रोडला इतर कोणाच्या नावाची मागणी होण्या आधीच "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कीर्तिकर यांच्या मागणीनुसार यशवंत जाधव यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. याबैठकीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, विरोधी पक्ष नेते रवी राजा, भाजपाचे गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, मनसेचे गटनेते दिलीप लांडे इत्यादी मान्यवर बैठकीला उपस्थित होते. गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी नंतर हा प्रस्ताव पालिक सभागृहात मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. पालिक सभागृहातील मंजुरी नंतर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठवला जाईल.
कसा असेल कोस्टल रोड - मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन एकूण ३५.६ कि.मी. लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणे तीन मीटर रुंदीची असेल. कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. कोस्टल रोड प्रकल्पासाठी बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल, तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहे. हा प्रकल्प झाल्यास ३४ टक्के अर्थात ३५० टन इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १० कोटी डॉलर्सची बचत होणार आहे.
