मुंबई -- मुंबईत पावसाळ्यादरंयान डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस गॅस्ट्रो, कावीळ अशा विविध साथीच्या आजारांची साथ परसते. हे आजार काही विशिष्ट उपाय केल्यास टाळता येतात किंवा त्याचा प्रसार कमी करता येऊ शकतो. याबाबत काय काळजी घ्यावी यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जाणार आहे. यासाठी दादर येथील गजबजलेल्या शिवनेरी बसस्थानकावर आरोग्यावर संदेश प्रदर्शित करण्याचा प्रस्ताव पालिकेचा आहे. यासाठी 10 लाख 98 हजार 250 रुपये खर्च केले जाणार आहे. बुधवारी होणा-या स्थायी समितीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.
पावसाळ्यात मुंबईत पसरणा-या विविध साथीच्या आजारांबाबत पालिकेने जनजागृती करण्याचे ठरवले आहे. दादर येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या शिवनेरी बसस्थानकावर 30 बाय 10 आकाराचे साईनबोर्ड आहे. त्यावर आरोग्य संदेश प्रदर्शित केल्यास प्रभावी जनजागृती होईल, असे पालिका प्रशासनाला वाटते आहे. मात्र ग्लो साईन बोर्डचा अधिकार इतर संस्थेकडे असल्यामुळे सदर कामासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिरात देऊन दरपत्रिका मागवून हेतू साध्य करता येणार नाही. त्यामुऴे अधिनियम 1888 च्या कलम 72(3) नुसार पालिकेच्या संकेतस्थळावर निविदा मागवण्याची अट शिथिल करण्यास स्थायी समितीची मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव आहे. पावसाळ्यात चार महिन्यांसाठी ही जनजागृती केली जाणार आहे.