भाजपाच्या गोशाळाना शिवसेनेकडून मुंबई बाहेरचा रस्ता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2017

भाजपाच्या गोशाळाना शिवसेनेकडून मुंबई बाहेरचा रस्ता


मुंबई प्रतिनिधी - केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून गोमाता आणि गोशाळा हा विषय सातत्याने गाजत आहे. मुंबईत दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर गोशाळा निर्माण कराव्यात असा प्रस्ताव भाजपाकडून पालिकेच्या सुधार समितीत सादर करण्यात आला होता. मात्र भाजपाकडून सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेने दफ्तरी दाखल करत भाजपचे गोशाळेचे स्वप्न भंग केले आहे. यामुळे भाजपाच्या गोशाळेच्या मागणीला शिवसेनेने मुंबईच्या बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा राजकीय वर्स्तुळात आहे.

भारतात भाजपा सरकार सत्तेवर आल्यावर गो हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला असून हा गुन्हा करणार्‍यांस दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोपालनास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोशाळा सुरू करण्याव्यात अशी ठरावाची सूचना भाजपचे नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी मांडली होती. मात्र मुंबईच्या मे २०१६ मध्ये पुर्नप्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखडा २०३४ मध्ये झालेल्या गोशाळेच्या उद्दिष्टासाठी कोणतेही आरक्षण ठेवलेले नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या ‘आवश्यक आणि अनिवार्य’ करण्यात आलेल्या कर्त्यव्यांनुसार गोशाळा, कोंडवाडे, गुरांच्या गोठ्यांचे निर्माण व संरक्षण करणे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य नाही. राज्य शासनाने जुलै २००६ मध्ये अधिसूचना काढून गुरांचे गोठे, कोंडवाडे मुंबईबाहेर स्थलांतरित करावे अशी अधिसूचना काढली आहे. या विषयावर नियोजन समितीत चर्चा करण्यात आली, मात्र नियोजन समितीने कोणतीही शिफारस केलेली नाही असे या प्रस्तावाला उत्तर देताना पालिकेने कळविले आहे. यामुळे हा प्रस्ताव सुधार समिती आणि सभागृहाने फेटाळला होता.

यानंतर पुन्हा मुंबईच्या गोरेगाव येथील १० हजार चौरस मीटर इतकी जागा गोशाळासाठी राखीव ठेवावी अश्या मागणीचा भाजपचे नगरसेवक राम बारोट यांचा प्रस्ताव सुधार समितीत सादर करण्यात आला होता. या विषयावर नियोजन समितीमध्ये चर्चा होऊनही प्रत्यक्ष विकास आराखड्यात मात्र शिफारस करण्यात आलेली नाही असे सांगत याबाबतचा प्रस्ताव सुधार समिती व पालिका सभागृहाने फेटाळला आहे. आज गुरुवारी पुन्हा याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत आला असता भाजपचे सदस्य प्रकाश गंगाधरे, ज्योती आळवणी, इत्यादी सदस्यांनी गोशाळा आवश्यक असल्याचे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या गोरेगाव येथे आधीच अनेक तबेले आहेत मग गोशाळाना नकार का असा प्रश्न उपस्थित केला. ज्या ठिकाणी नागरिकांची वस्ती नसेल, जो भूखंड वनक्षेत्र म्हणून आरक्षित आहे अश्या जागेवर गोशाळांसाठी जागा आरक्षित करा अशी मागणी केली.

यावर शिवसेनेचे रामकांत रहाटे, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य यांनी मुंबईमधील तबेल्यांना मुंबई बाहेर हलवण्याचा कायदा राज्य सरकारने केला आहे. शिवसेनेचा गाईला विरोध नसून गोठ्यांना विरोध आहे. तबेल्यामधून शेण वाहून नदी आणि नाल्यामध्ये जाते यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे या गोशाळा मुंबईच्या सिमेबाहेर असाव्यात अशी भूमिका मांडली. यावर सुधार समितीत या विषयावर सारखी चर्चा करण्यापेक्षा मुंबईचा विकास आराखडा बनत आहे या आराखड्यात गोशाळांसाठी जागा आरक्षित करण्याबाबत भाजपाने विचार करावा असा सल्ला देत शिवसनेच्या सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी गोशाळेचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. यामुळे भाजपाच्या गोशाळेच्या मागणीला शिवसेनेने मुंबईच्या बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा राजकीय वर्स्तुळात आहे.

Post Bottom Ad