मुंबई - उद्याच्या डॉक्टरांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर मंडळींशी चर्चा करता यावी, आजार व उपचार पद्धतींबाबत वैद्यकीय क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन व बदल याबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या केइएम रुग्णालयात तीन दिवसीय 'कॉनफ्ल्यूएन्स २०१७' चे आयोजन करण्यात आले आहे. २७ जुलै रोजी पहिल्या दिवशी 'महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग, भारतीय लष्कराचे मेजर दीपक राव, भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टोमी, डॉ. ममता लाला यांच्यासारखे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यवर उद्याच्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत.
महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित होणा-या या परिषदेला देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे सुमारे १ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 'कॉनफ्ल्यूएन्स २०१७' मध्ये वैद्यकीय विषयांवरील चर्चासत्रे, मान्यवरांची व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण, कार्यशाळा, वैद्यकीय चित्रफितींचे सादरीकरण, वैद्यकीय विषयांशी निगडीत अभिनव प्रश्नमंजुषा स्पर्धा, वैद्यकीय विषयांवरील वादविवाद स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना नवनवीन बाबींची माहिती व्हावी, या उद्देशाने 'कॉनफ्ल्यूएन्स २०१७' आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कॉनफ्ल्यूएन्सच्या संयोजकांनी दिली आहे.