
मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर दामोदर पार्कजवळील सिद्धी साई हि चार मजली इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १७ वर पोहचाल आहे. मृतांमध्ये एका तीन महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून सात जखमींवर राजावाडी व शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सात जणांवर उपचार करून सोडण्यात आले आहे.
घाटकोपर एलबीएसमी मार्गावरील दामोदर पार्क येथे सिद्धी साई हि तळ मजला अधिक तीन मजले असलेली इमारत १९८१ साली बांधण्यात आली होती. हि इमारत ३६ वर्षे जुनी होती. इमारतीच्या तळ मजल्यावर सितप नर्सिग होम होते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही कुटंब राहत होती. या इमारतीमध्ये एकूण १५ रूम असून ९ रूममध्ये रहिवाशी राहत होते. तर ६ रूम बंद होते. पालिकेच्या नियमानुसार ३० वर्षपेक्षा जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक आहे. तरीही या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नव्हते. पालिकेनेही या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात कोणतीही नोटीस दिली नव्हती. तळ मजल्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते सुनिल सितप यांच्या मालकिचे सितप नर्सिग होम होते. त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. सुनील शितपने नर्सिंग होमच्या नूतनीकरणावेळी इमारतीचे पिलर बाजूला काढून त्याठिकाणी लोखंडी चॅनल लावले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले गेल्याने पीलर्सला धोका निर्माण होऊन हे इमारत कोसळली.
दुर्घटना ठिकाणी बचाव कार्य बुधवारीही सुरु होते. या दुर्घटनेमध्ये अद्याप सात जण जखमी आहेत. यापैकी वर्षा सकपाळ, गिता रामचंदानी, अब्दुल शेख यांच्यावर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात तर राजेंद्र दोशी, गणेश तकडे, प्रज्ञाबेन जडेजा, रिती खालचंदानी यांच्यावर शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विठ्ठल श्रीगिरी, सुभाष चव्हाण, ललित ठक, प्रीतेश शहा, पारस अजमेरा, ऑल़्डीकॉस्टा डिमेलो, धार्मिष्ठा शाह या सात जणांवर उपचार करून सोडण्यात आले आहे. या प्रकरणी विक्रोळी पार्क साईट पोलिसांनी सुनिल सितप यांच्यावर पार्क साईट पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सितप यांना न्यायालयात हजार केले असता त्यांना २ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मृतांची नावे
रंजनबेन शहा (६२)
सुलक्षणा खनचंदानी (८०)
रेणुका ठक (३ महिने)
मनसुखभाई गज्जर (७५)
अमृता ठक (३१)
पंढरीनाथ डोंगरे (७५)
दिव्या पारस अजमेरा (४८)
मिकुल खनचंदानी (२२)
ऋत्वी प्रितेश शहा (१४)
किशोर खनचंदानी (५०)
मनोरमा डोंगरे (७०)
क्रीषु डोंगरे (१३ महिने)
प्रमिला ढग (५६)
तिराली अजमेरा (२४)
बिना देवरा (४६)
समुद्रा देवरा (७७)
विजय देवरा (५२)
