
मुंबई - कुर्ला पश्चिम येथील एल विभागातील विनोबा भावे नगर मधील म्हाडा कॉलनीतील रहिवाश्याना मागील एप्रिलपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. पावसाळयात या प्रमाणात वाढ झाली असून मागील आठ दिवस येथील रहिवाशांना टँकरचे पाणी प्यावे लागते आहे. दूषित पाण्यामुळे या विभागात साथीचे आजार वाढल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रार करूनही समस्या अद्याप सुटलेली नसल्याने रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत विनोबा भावे नगरातल्या म्हाडा कॉलनीत सुमारे 20 ते 25 हजार लोकसंख्या असलेली वसाहत आहे. चार मजली असलेल्या 8 इमारती आहेत. गेल्या एप्रिलपासून कॉलनीला होणारा पाणी पुरवठा दूषित पाण्याने होतो आहे. रहिवाशांनी याकडे संबंधित पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र आजमितीस ही समस्या प्रशासनाला दूर करता आलेली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून माती मिश्रीत गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून अधूनमधून पाण्याचा दाबही कमी आहे. कधी कधी तर पाण्याच्या प्रवाहासोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कपड्यांचे छोटे छोटे तुकडेही पाण्यासोबत येत असल्याने पाणी प्यायचे कसे या चिंतेत रहिवासी आहेत. अनेक जणांना काटकसर करून बिसलेरीचे पाणी प्यावे लागते असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. पिण्यायोग्य पाणी नसल्याने गेल्या चार दिवसांपासून येथे टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे. त्यासाठी रहिवाशांना रांगा लावून पाणी भरावे लागते आहे. पाण्यासाठी अनेक रहिवाशांना नोकरी, व्यवसायाला दांड्या माराव्या लागते आहे. येथे साथीच्या आजाराचे प्रमाणही वाढले आहे. दूषित पाण्याची समस्याही अद्याप सुटलेली नसल्याने रहिवासी चिंताग्रस्त आहेत. मागील तीन महिन्यापासून ही समस्या कायम असल्याने येथील रहिवाशांचा संताप अनावर झाला असून उद्रेक होण्याची शक्यता आहे. स्थानिक नगरसेवकांकडे रहिवाशांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. त्यांचाही प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, मात्र तरीही समस्या सुटत नसल्याने संतप्त रहिवाशांना आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
कंत्राटदाराने काम नीट न केल्याने ही समस्या - विनोबा भावे नगर येथील पाण्याच्या लाईनचे काम सुरू होते, त्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो आहे. कंत्राटदाराने काम नीट न केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. गढूळ पाणी आल्यास रहिवाशांनी पीऊ नये. हळू हळू ही समस्या दूर होईल.
शैलेश मुत्रक, पालिका कनिष्ठ अभियंता,
एल विभाग, कुर्ला
