बँकांच्या शुल्क आकारणी विरोधात ट्विटर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2017

बँकांच्या शुल्क आकारणी विरोधात ट्विटर मोर्चा


मुंबई - बँकांकडून लादल्या जाणाऱ्या अयोग्य शुल्क आणि दंडआकारणीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनीलाइफ फाउंडेशनच्या विश्वस्त सुचेता दलाल यांच्या पुढाकाराने आज मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे ट्विट मोर्चा आंदोलन करण्यात आले होते. बँकांच्या या बेबंदशाहीमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना यामुळे ट्विटर च्या माध्यमाने आपल्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचवता याव्यात हा यामागचा उद्देश होता असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांसाठी जनधन अकाऊन्ट योजना आणली होती आणि या अकाऊन्टमध्ये सरकारतर्फे प्रत्येक खातेदाराच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ते पैसे खात्यात जमा झालेच नाहीत. पण आज अशी परिस्थिती आलेली आहे की, स्वतःचे पैसे बँकेतून काढताना किंवा खात्यात भरताना त्यावर बँकेला दंड भरावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकांकडून रोज नवे नियम बनवले आणि ग्राहकांवर लादले जात आहेत. जसे ५ हजार पेक्षा कमी रक्कम जर खातेदाराच्या खात्यात असेल तर त्याला दंड लावला जातो, ३ पेक्षा जास्त ट्रँजॅक्शन्स झाल्यास बँकेकडून शुल्क आकारणी होते, दीड लाखापेक्षा जास्त पैसे जर खात्यात भरायचे असतील तर बँकेकडून दंड आकारला जातो, वगैरे वगैरे. यामागचा उद्देश्श एकच. मोठ-मोठ्या उद्योजकांनी जे करोडो रुपयांचे कर्ज बँकांकडून घेतले आहे आणि ते बुडीत निघाले आहे, ते ग्राहकांकडून जास्तीत जास्त दंड आकारून वसूल करावे. बँकांकडून ग्राहकांचे शोषण सुरू आहे.

ही जी बँकांच्या माध्यमातून सामान्य जनतेची लूट सुरु आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मनीलाइफ फाउंडेशनच्या विश्वस्त सुचेता दलाल यांच्या समवेत आम्ही ट्विटर मोर्चा आंदोलन करायचे ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ट्विटरवर नेहमी सक्रीय असतात. म्हणून आम्ही ट्विटरच्या माध्यमातून बँकेच्या दंडआकारणीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला आवाहन केले की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या अभियानात सामील होऊन आपला आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचवावा. या अभियानाला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद लाभला. देशभरातून लोकांनी आपल्या व्यथा ट्विटर च्या माध्यमातून व्यक्त केल्या, असे निरुपम म्हणाले.

Post Bottom Ad