कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत बृहन्मुंबई महापालिका राज्यात अव्वल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2017

कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत बृहन्मुंबई महापालिका राज्यात अव्वल

मुंबई / प्रतिनिधी - 
बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे महापालिका क्षेत्रात कुटुंब नियोजन विषयक विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी नियमितपणे केली जात असते. या अंमलबजावणी अंतर्गत 'पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया' आणि प्रसूति पश्चात तांबीचा वापर राज्यभरात सर्वात प्रभावी पद्धतीने करुन संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल कामगिरी करणा-या बृहन्मुंबई महापालिकेचा विशेष गौरव महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आला आहे. 

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव करण्यात आला. कुटुंब नियोजन कार्यक्रम अंमलबजावणीत राज्यात अव्वल ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर उपकार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे, विशेष आरोग्य अधिकारी (कुटुंब कल्याण) डॉ. आशा अडवाणी इत्यादींनी हा सन्मान स्विकारला.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करणे, याबाबत प्रचार व प्रसिद्धी करणे यासारख्या अनेक बाबी महापालिकेद्वारे करण्यात येतात. कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत 'बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया' आणि 'प्रसूति पश्चात तांबीचा वापर' यांचा वापर करण्याबाबत राज्यात सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी ही मुंबई महापालिका क्षेत्रात करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत वर्ष २०१६-१७ मध्ये ७३६ बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया (पुरुष) करण्यात आल्या. तर ७ हजार ८३५ प्रकरणी प्रसूति पश्चात तांबीचा वापर करण्यात आला. याच बाबीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा गौरव केला आहे. 

या कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंह, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. प्रदिप व्यास, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, राज्याच्या आरोग्य सेवेच्या अतिरिक्त संचालिका डॉ. अर्चना पाटील, एफ. पी. ए. आय. च्या डॉ. अनुजा गुलाठी यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले मान्यवर व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते.

Post Bottom Ad