मुंबई, दि. २० - महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या संयुक्तविद्यमाने २७ व २८ जुलै २०१७ रोजी मुंबई येथे ‘महिलांची तस्करी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेत मानवी हक्क, बाल हक्क, महिलांचे अधिकार आदी विषयात कार्य करणारे २० हून अधिक देशातील सुमारे १०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राज्यातील तसेच देशातील संबंधित मंत्री, विविध आयोगांचे अध्यक्ष, सचिव, या क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत २ दिवस या विषयावर समग्र चर्चाहोऊन ही अमानवी प्रथा रोखण्यासाठी एक फोरम तयार करण्यात येईल. तसेच विविध उपाययोजना सुचविण्यात येतील, अशी माहितीही रहाटकर यांनी यावेळी दिली. जुहू येथील जे.डब्ल्यू. मॅरिएट येथे ही परिषद होईल.
रहाटकर म्हणाल्या, तस्करीसारखे कृत्य अत्यंत संघटित आणि नियोजनबद्ध पध्दतीने कोणत्याही सीमेचे बंधन न बाळगता राबविले जात असल्यामुळे या गोष्टीची चर्चा जागतिक पातळीवर होणे आवश्यक झाले आहे. देशभरात साधारण २७ लाख महिला देहविक्रीसह इतर अवैध व्यवसायात ढकलल्या गेल्या आहेत. महिलांच्या होणाऱ्या तस्करीतून दरवर्षी साधारण ३०हजार महिला या दुर्दैवी क्षेत्रात ढकलल्या जातात. हे रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य महिला आयोगाने हा पुढाकार घेतला असून देशात प्रथमच या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत तीन पूर्ण सत्र आणि पाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्त्यांचा समावेश असलेल्या चर्चासत्रांचा समावेश असणार आहे. पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये महिला तस्करी संदर्भातील प्रत्यक्ष घडणारे गुन्हे आणि त्याचे महिलांवर होणारे परिणाम याविषयीचर्चा होईल. २७ जुलै रोजी होणाऱ्या चर्चासत्रामध्ये तस्करी, महिलांवर होणारे अत्याचार व त्यामागील वास्तव आणि त्याचे परिणाम या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चर्चासत्रामध्ये मानवी तस्करीसारखे गुन्हे रोखणे व त्याविरूध्द लढणे आणि त्याबरोबरच राज्याचा विकासावर तस्करीमुळे होणारा परिणाम या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होईल.
२८ जुलै रोजी मानवी तस्करीविरूध्द लढणे आणि त्याला नष्ट करण्यासाठी घेण्यात आलेला पुढाकार यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यातील पहिले चर्चासत्र मानवी तस्करीला प्रतिबंध करणारे कायदे आणि न्यायव्यवस्था उभी करण्याबाबत असेल. दुसरे चर्चासत्र मानवी तस्करीतून बचावलेल्या व्यक्ती आणि या चळवळीत सहभागी होणाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या भाषणांचा समावेश असणार आहे. हे सर्वजण मानवी तस्करीला बळी पडलेल्यांना पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्याबाबतीत आणि समाजात स्थान मिळवून देण्याबाबतीत आपले विचार व्यक्त करणार आहेत. या तीनही चर्चासत्रात मिळून मानवी तस्करी संबंधातील गुन्हेगारी, सायबर ट्रॅफिकिंग आणि तस्करी विरोधात माध्यमांची भूमिका याबाबतीत प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यातील अखेरचे सत्र महिलांच्या तस्करीला कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल यावरील चर्चेचे होणार आहे.