भांडूपमधील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा आरक्षित भूखंड विकासकाच्या घशात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2017

भांडूपमधील सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा आरक्षित भूखंड विकासकाच्या घशात


भ्रष्ट पालिका अधिकारी व शिवसेना नेत्यांची चौकशी करा - शिशिर शिंदे 
मुंबई / प्रतिनिधी - भांडुप पश्चिमेकडील नियोजित सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी राखीव असलेला ८२०९ चौरस मीटरचा भूखंड पालिकेने विकासकाच्या घशात घातला आहे. रुग्णालयाचा हा भूखंड विकासकाच्या घश्यात घालणाऱ्या पालिकेतील भ्रष्ट अधिकारी व सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केली आहे.

भांडुप पश्चिम येथील रुणवाल होम्स विकासकाकडे एकूण १८ हजार ७६५ क्षेत्रफळाचा भूखंड मुंबई पालिकेला ५५० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी जून २०१३ पासून राखीव ठेवण्यात आला. त्यासाठी दिडशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा भूखंड संबंधित विकासकाच्या ताब्यात देण्याची नामुष्की ओढवली आहे. हा भूखंड मिळण्यासाठी मी व मनसेच्या तत्कालीन नगरसेवकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यश आले होते. तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्वतः या भूखंडाची पाहणी केली. तसेच एवढा मोठा भूखंड पालिकेला मिळवून दिल्यामुळे आपली प्रशंसा केली होती. परंतु, गेल्या चार वर्षात पालिकेने येथे साधी वीट देखील रचलेली नाही. रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या वांरवार भेटी घेवून चर्चा केली. यावेळी रुग्णालय बांधण्याचे आश्वासन आयुक्त अजोय मेहता यांनी आपल्याला दिले होते, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

पालिकेत सत्ताधारी असणारी शिवसेना आणि काही भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे पालिका हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्यास पूर्ण अपयशी ठरले आहे. यामुळे सुमारे २०० कोटी रुपयांचा अत्यंत मुल्यवान भूखंड गमावण्याची नामुष्की पालिकेवर आली आहे. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे करदाते मुंबईकर एका चांगल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला मुकणार आहेत. त्यामुळे या प्रकरणी जे जे अधिकारी ह्या भ्रष्टाचारात सामील आहेत, त्यांची दोन महिन्यात चौकशी पूर्ण करावी. तसेच यात दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चित करावा व त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. अंधेरी येथील भूखंडावर सेव्हन हिल हे सामान्य लोकांना न परवडणारे रुग्णालय बांधण्यात आले. भांडुप येथील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंड आता विकासकाच्या घश्यात घातला जात आहे. तसा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत आला आहे. असा प्रस्ताव मंजूर झाल्यास तो दिवस पालिकेच्या इतिहासातील काळा दिवस असेल असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS