मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारी २०१७ ला संपन्न झाली. मात्र हि निवडणूक संपन्न होऊन पाच महिने झाले तरी अद्याप विजयी व पराभूत उमेदवारांना अनामत रक्कम परत करण्यात आलेली नाही. हि रक्कम लवकरात लवकर उमेदवारांना परत करावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सदानंद परब यांनी स्थायी समितीत केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण २२७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांपैकी काही उमेदवारांकडून ५ हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकडून अडीच हजार रुपये अनामत रक्कम पालिकेने घेतले होते. याच बरोबर उमेदवारांकडून काढण्यात येणाऱ्या रॅली, कार्यालय सुरु करणे, सभा इत्यादीसाठी अनामत रक्कम घेण्यात आली आहे. हि अनामत रक्कम प्रत्येक उमेदवाराकडून अंदाजे २५ ते ३० हजार रुपये इतकी होते. हि रक्कम उमेदवारांना अद्याप परत केलेली नाही. पालिकेच्या निवडणुकीत ५५.५३% एवढे विक्रमी मतदान झाले होते. यात एकूण ९१,८०,४९१ मतदारांपैकी ५०,९७,५६५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता. सदानंद परब यांनी हि अनामत रक्कम निवडून आलेल्या नगरसेवकांना अद्याप परत मिळाली नाही मग पराभूत उमेदवारांची काय परिस्थिती असेल याचा विचार करावा असे आवाहन करत प्रशासन वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप केला. हि अनामत रक्कम उमेदवारांना लवकरात लवकर परत करावी अशी मागणी परब यांनी केली. तर नगरसेवक मंगेश सातमकर यांनी नगरसेवकांचे ईसीएस क्रमांक पालिकेकडे आहेत. मग हि रक्कम वळती करण्यासाठी काय अडचण आहे असा प्रश्न उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी उमेदवारांची अनामत रक्कम लवकरात लवकर देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.