
मुंबई - मुंबईत बंद पडलेली झुणका भाकर केंद्र आता अन्नदाता आहार केंद्र या नावाने सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी मिळाली असून सभागृहाच्या मंजुरी नंतर हि आहार केंद्रे सुरु होतील. सध्या मुंबईत 113 झुणका भाकर केंद्रे सुरू असून उर्वरित बंद असलेली 102 केंद्रेही टप्प्या-टप्प्याने अन्नदाता आहार केंद्रे या नावाने सुरु केली जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीत दिली.
शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळात राज्यभरात ‘झुणका भाकर केंद्र’ योजना सुरू करण्यात आली होती. मुंबईत 125 चौ. फुटांच्या जागेत हा उपक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. त्यामुळे शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळाला होता. मात्र पुढे ही योजना अपयशी ठरल्याने 2000 साली राज्य सरकारने ही केंद्रे बंद केली. 215 केंद्रापैकी यातील 113 केंद्रे सध्या कार्यरत आहेत. महापालिकेच्या अधिकारानुसार झुणका भाकर केंद्रे दुसर्या नावाने सुरू करण्याचा निर्णय २००९ मध्ये घेण्यात आला. तसे परिपत्रकही काढण्यात आले. त्यावेळी सहाय्यक आयुक्तांच्या नेतत्वाखाली समितीही स्थापन करण्यात आली, मात्र त्याची आजमितीस अंमलबजावणी झाली नाही, याकडे शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर बंद झालेली झुणका भाकर केंद्रे आयुक्तांच्या अभिप्रायानुसार व 2009 च्या प्रशासनाच्या परिपत्रकानुसार अन्नदाता आहार केंद्र नावाने सुरू करावीत, अशी मागणीही शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी केली. त्यावर कोणताही विरोध न होता, प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान ही योजना महापालिकेच्या भूखंडावर अन्नदाता आहार केंद्रे या नावाने चालवण्याचा निर्णय़ पालिका प्रशासनाने घेतला आहे.
योजनेमध्ये अन्नदाता आहार केंद्र या नावाने 215 अन्नदाता आहार केंद्रे व 125 शिव वडापाव हातगाडी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्ते, पादचारी मार्ग आणि आरक्षित जागांवर अशा स्टॉल्सना परवानगी देता येणार नाही. मार्गदर्शक तत्त्वानुसार 215 पैकी महापालिकेच्या जागेवरील 113 झुणका भाकर केंद्रे सध्या कार्यरत आहेत. उर्वरित 102 केंद्रेही अन्नदाता आहार केंद्रात रुपांतर करण्यात येणार आहेत, याची अमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले.