मुंबई / प्रतिनिधी - मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मुख्यालयाच्या गेटवरून प्रत्येकाची तपासणी करून प्रवेश दिला जात होता. मोर्चेकरी मुख्य इमारतीत येऊ नये म्हणून कोणसही कामाशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. या मध्ये काही पत्रकारांनाही त्याची झळ बसली. मात्र प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा ठेवणाऱ्या प्रशासनाकडून पालिका मुख्यालया परिसरात लावण्यात आलेले बहुतेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते.
मराठा मोर्च्याची संख्या पाहता पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र आजपर्यंतचे सगळे मराठ्यांचे मोर्चे शांततेत आणि शिस्तीत असल्याने कोणताही अनुचित होणार नाही याची बहुदा खात्री असल्यानेच पालिका प्रशासन आणि पोलीस खाते निर्धास्त राहिले. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सर्व गेटवर तसेच टेरेसवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र यातील ९० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे काही उपयोगाचे नाहीत. सर्वच कॅमेरे बंद स्थितीत आहेत. तर काही कॅमेरात लोकांच्या प्रतिमा अस्पष्ट दिसत असल्याने मोर्च्याच्या वेळी जर काही अनुचित घटना घडली असती तर पोलीस तपासात या कॅमेऱ्यांचा काहीही उपयोग झाला नसता. रझा अकादमीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्च्यांच्या वेळेला अनुचित घटना घडल्या होत्या त्यावेळी पालिकेच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना हल्लेखोरांवर कारवाई करणे शक्य झाले होते. याचा विचार करता मुख्यलयातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणे किती महत्वाचे आहे याचा विसर प्रशासनाला पडलेला असल्याचे दिसत आहे.