आरक्षण देता येत नसेल, तर सत्तेतून पायउतार व्हा - मराठा मोर्चाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2017

आरक्षण देता येत नसेल, तर सत्तेतून पायउतार व्हा - मराठा मोर्चाचा इशारा


आश्वासन नको, लेखी हमी द्या -
नितेश राणे यांची गाडीही मोर्चेकऱ्यांनी अडवली -
मुंबई / प्रतिनिधी -
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या इत्यादी मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मुक मोर्चावेळी आरक्षण देता येत नसेल, तर सत्तेतून पायउतार व्हा, असा इशारा सरकारला देण्यात आला. यावेळी ज्यांना आम्ही सत्तेत बसवले त्यांच्याशीच आम्हाला लढावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

मुंबईतला ५८ वा मोर्चा मराठा समाजाचा शेवटचा निर्णायक मोर्चा असल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता भायखळ्यातील जीजामाता उद्यानातून सुरू झालेला मोर्चा जे. जे. उड्डाणपुलावरून आझाद मैदानात एकच्या सुमारास पोहोचला. मात्र सकाळपासूनच मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमुळे आझाद मैदान पूर्णपणे भरून गेले होते. अनेक मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर उतरून मोर्चात सहभागी झाल्याने जेजे उडडाणपूलापासूनचा सीएसटी परिसर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मोर्चेकरांच्या हातातील झेंड्यामुळे सदर परिसर भगवामय झाला होता. या मुक मोर्चा दरम्यान जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, कोण बोलतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही अश्या घोषणांनी आझाद मैदान व सीएसटी परिसर दणाणून सोडला होता. आझाद मैदानात व मैदानाबाहेर गर्दी असल्याने मोर्चेकरी मानवी हक्क आयोगाच्या इमारतीवर, पालिकेसमोरील फिरोज शाह यांच्या पुतळ्यावर, अमर जवान ज्योत वाहतूक बेटावर तसेच स्पिकरवरही चढून मोर्चातील भाषणांचा आस्वाद घेत होते. 

मोर्चादरम्यान मराठा समाजातील युवतींनी संबोधित करताना मराठा समाजाच्या मागण्यांकडे ५७ मोर्चे काढूनही सरकार दुर्लक्ष करत असल्याने मुंबईत मोर्चा काढावा लागला आहे. मराठा समाज दुखावला तर काय परिस्थिती निर्माण होईल याची जाणीव कुणालाही नाही. आम्ही छत्रपती शिवाजींचे वारसदार असून आम्हाला क्रांती घडवून आणायला वेळ लागणार नाही. आमच्या हातात नांगर असला तरी हातात तलवार घ्यायला वेळ लागणार नाही. आम्ही ज्यांना सत्तेत बसवले त्यांच्याशीच लढावे लागेल असे वाटले नव्हते. मराठ्यांनी ठरवले तर पुन्हा या सरकारला निवडून आणणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा समाजाचे शेकडो आमदार असतानाही समाजाची दखल घेतली जात नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जात असल्याने या कायद्यात योग्य ते बदल करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. इतर समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केला नाही मग आमच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सरकार मुलगी वाचवा, मुलगी शिकवा असे बोलते मात्र मुलींचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर परतलेल्या शिष्टमंडळाने मोर्चेकऱ्यांना भेटीदरम्यानची माहिती देण्यास संभाजीराजे यांनी सुरुवात करताच मोर्चेकऱ्यांनी गोंधळ सुरुवात केली. काँग्रेसचे आमदार नितेश राणे व्यासपीठावर चढताच मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शिष्टमंडळाचे समाधान झालेले दिसत असले, तरी केवळ आश्वासन नको, तर लेखी हमी द्या, असे म्हणत काही मोर्चेकऱ्यांनी विधानभवनाच्या दिशेने कूच केली. नितेश राणे मोर्चेकऱ्यांना समजवून गाडीत बसून निघत असतानाच राणे यांची गाडीही मोर्चेकऱ्यांनी अडवली. त्यामुळे नितेश राणे अखेर मोर्चेकऱ्यांसोबत पायी विधानभवनाच्या दिशेने निघाले. मोठ्या संख्येने मोर्चेकरी आक्रमक होत विधानभवनाच्या दिशेने निघाल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. मात्र या फौजफाट्यालाही मोर्चेकरी न जुमानता विधानभवनाच्या दिशेला कूच करून गेले.

महिनाभरानंतर तोडफोड -
एक महिन्यात लेखी उत्तराची वाट बघू अन्यथा तोड फोड मार्गाचा वापर करु, असा सूचीत इशारा, अर्जून राजे भोसले यांनी मोर्चानंतर स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने दिला आहे. याबाबत उदयन राजे भोसले यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

४ हजार लोकांवर पालिकेकडून उपचार -
मुंबईत निघालेल्या मराठा मोर्चा दरम्यान मुंबई महापालिकेकद्वारे मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यासाठी महापालिकेने ५ ठिकाणी उपचार केंद्रे सुरु केली होती. या उपचार केंद्रातून तब्बल ४ हजार लोकांवर उपचार करण्यात आले. यापैकी एकाला फॅक्चर झाले असून एकाला फेफरे भरले होते. यापैकी काही लोकांना सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. बहुतेकांना मोर्चादरम्यान उन्हामुळे त्रास, चक्कर येणे, अशक्तपणा यासारखा त्रास झाला होता.

मोर्चादरम्यान पालिकेची आरोग्याबाबत जनजागृती -मराठा मोर्चासाठी बुधवारी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे लोक मुंबईच्या आझाद मैदान परिसरात दाखल झाले होते. मुंबईमध्ये विविध आजार पसरत असल्याने हा मोर्चा सुरू असताना महापालिकेने मोर्चात सहभागी झालेल्या लोकांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाबाबत जनजागृती केली. महापालिकेच्या किटकनाशके विभागातर्फे यावेळी सामान्य जनतेमध्ये डेंग्यू आणि मलेरिया या रोगांविषयी जनजागृती व्हावी यासाठी एक प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS