राजकीय दबावाखाली मराठा मोर्चाला पालिकेकडून मोफत सुविधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राजकीय दबावाखाली मराठा मोर्चाला पालिकेकडून मोफत सुविधा

Share This

मुंबई / प्रतिनिधी -
राज्य सरकारचा कारभार हाकला जातो असे मंत्रालय मुंबईत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षभरात हजारो मोर्चे आझाद मैदानात येत असतात. या मोर्चाना राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेकडून कोणत्याही सोयी सुविधा पुरावल्या जात नाहीत. मात्र बुधवारी 9 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. राजकीय दबावाखाली झुकत मुंबई महापालिकेने शौचालय, पिण्याचे पाणी व वैद्यकीय सेवा मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे. एका समाजाच्या मोर्चाला अश्या सोयी सुविधा मोफत दिल्यास अशी प्रथा पडणार असून सर्वच समाजातील मोर्चाला आता पालिका मोफत सोयी सुविधा पुरवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणतेही शुल्क भरल्याशिवाय मराठा मोर्चाला सेवासुविधा पुरवणार नाही, असे मुंबई महापालिकेने ठणकावून सांगीतले होते. मात्र त्यानंतर राजकीय पुढाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना साकडे घातल्यावर मराठा मोर्चाला मोफत सेवा पुरवण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने राजकीय दबावाखाली झुकत एका समाजाच्या मोर्चाला सोयी सुविधा पुरवण्याची तयारी केली आहे. यासाठी पालिकेने उपायुक्त आनंद वाघराळकर यांची नियुक्ती केली आहे. मोर्चाच्या मार्गात माटुंगा, प्रतीक्षा नगर नाला येथे 2, जे. के. केमिकल नाला येथे 3, बीपीटी सिमेंट यार्ड येथे 4, भायखळा ई. एस. पाटनावाला मार्ग येथे 2, ह्युम हायस्कूल एटीएस कार्यालय येथे 1, हज हाऊस येथे 1, आझाद मैदान येथे 2 अशी 7 ठिकाणी 15 फिरत्या शौचाललयाची व्यवस्था केली आहे. वसंतदादा पाटील इंजिनीयरिंग कॉलेज, सायन येथे 2, बीपीटी सिमेंट यार्ड येथे 4, राणीबाग येथे 1, आझाद मैदान येथे 1 अश्या ४ ठिकाणी 8 मोठे पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर प्रियदर्शनी, जे. जे. उड्डाणपुलाजवळ, सीएसटी रेल्वे स्टेशन, आझाद मैदान, बीपीटी सिमेंट यार्ड या ठिकाणी 120 डॉक्टर्स नेमण्यात आले असून वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. या पथकात 10 महिला व 10 पुरूष डॉक्टर तसेच ठिकठिकाणी अँब्युलन्स उपलब्ध केली जाणार आहे. तसेच टोईंग गाड्याही ठिकठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages