
मुंबई / प्रतिनिधी -
बकरी ईदच्या कालावधीत देवनार पशुवधगृहात विक्रीसाठी आलेल्या शेळ्या-मेंढ्या तसेच म्हैस -रेडे यासाठी सोई- सुविधांसाठी करण्यात येणा-या खर्चामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2014 पासून एक ते दीड कोटीने महसूल कमी झाला आहे. त्यामुळे बकरी ईदच्या कालावधीत आता शेळ्या-मेंढ्या व इतर प्राण्यांसाठी प्रत्येकी 100 रुपये इतके प्रशासकीय, व्यवस्थापन शुल्क पालिकेकडून आकारले जाणार आहे. बकरी ईद पूर्वीचे 12 दिवस, बकरी ईदचा दिवस व नंतरचे दोन दिवस असे एकूण 15 दिवसाचे शुल्क घेतले जाणार आहे. हा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
बकरी ईदच्या निमित्त देवनार पशुवध गृहामध्ये सुमारे 1,75,000 ते 2,00,000 इतक्या शेळ्या-मेंढ्या दरवर्षी येत असतात. सदर शेळ्या-मेंढयांना निवारा शेड, पाण्याची व्यवस्था करणे, जनावरांपासून निर्माण होणा-या कच-याची तात्काळ विल्हेवाट लावणे, साफसफाई करीता महापालिकेच्या कामा व्यतिरिक्त खासगी संस्थाव्दारे सफाईचे काम, शृंगी (म्हशी) जनावरांच्या धार्मिक वधासाठी व्यवस्था, पशुवधगृहात सोयी -सुविधा पुरवणे, अतिरिक्त विद्युत पुरवठा आदी पालिकेतर्फे 15 दिवस कामे पार पडली जातात. पालिकेतर्फे पुरवण्यात येणा-या सेवा -सुविधांचा वापर, शेळ्या- मेंढ्यांचे व्यापारी तसेच शृंगी जनावरांचे व्यापारी यांच्या करीता होतो. सदर कामे पार पाडताना महापालिकेवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडतो. त्यामुळे 2014 पासून मिळणारा महसूल एक ते दीड कोटीने कमी झाला आहे. सन २०१४ मध्ये 3 कोटी 15 लाख 89 हजार 190 रुपये, २०१५ मध्ये 3 कोटी 98 लाख 33 हजार 126 रुपये, तर २०१६ मध्ये 8 कोटी 5 लाख 91 हजार 209 रुपये इतकी घाट झाली आहे. आर्थिक उत्पनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पशुवध गृहात विक्रीसाठी येणा-या शेळ्या-मेंढ्या व व इतर जनावरांसाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचे प्रस्तावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हा प्रस्ताव मागील जून महिन्याच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झाला असून आता स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
