दुपारी मातोश्रीवर बैठक -
मुंबई / प्रतिनिधी -मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यात मुंबई महापालिका व राज्य सरकार अपयशी ठरल्याने कर्मचाऱ्यांच्या बेस्ट कर्मचारी कृती समितीने रविवारी (६ ऑगस्ट) मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. बेस्टने संप पुकारल्यावर रविवारी रात्रीपासूनच कर्मचारी कामावर आले नसल्याने सोमवारी सकाळपासून एकही बस डेपोबाहेर पडलेली नाही. ७ ऑगस्ट हा बेस्टच्या ७० व्या वर्धापन दिन साजरा केला जात असतानाच संप सुरु झाला आहे.या संपत बेस्टचे ३६ हजार कर्मचारी उतरले आहेत. आज रक्षाबंधन असल्याने रक्षाबंधनासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. दरम्यान बेस्ट प्रशासन, सरकार व महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या या बेफिकीर वृत्तीबद्दल मुंबईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. बेस्टमधील कर्मचाऱ्यांच्या १२ संघटनांनी कृती समिती स्थापन करत संपाबाबत मतदान घेतले. ९७ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले होते. त्यानंतर कृती समितीने संप न पुकारता उपोषणाचा पर्याय स्वीकारला. संपापूर्वी इशारा म्हणून १ ऑगस्ट पासून ३ ऑगस्ट या तीन दिवसात उपोषण केले. या उपोषणाकडे महापालिका, राज्य सरकारने दुर्लक्ष केले. उपोषणकर्त्यां युनियन पदाधिकाऱ्यांची प्रकृती खालावत चालल्याने गुरुवारी ३ ऑगस्टला उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण मागे घेताना ६ ऑगस्टआधी निर्णय न घेतल्यास ६ ऑगस्टच्या मध्यरात्री पासून संपावर जाण्याचा इशारा कृती समितीकडून देण्यात आला. या दरम्यान महापौरांकडे याबाबत सहा ते सात बैठका झाल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बैठका घेतल्या मात्र या सर्व बैठका निष्फळ ठरल्या.
मुख्यमंत्र्यांकडे रविवारी आयोजित बैठकीत बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेला देण्यात यावा असे आदेश बैठकीत आयुक्तांना दिले. त्याला आयुक्तांनी तयारी दाखवली आहे. यावेळी राज्य सरकारकडूनही हवी ती मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. मात्र पालिका आयुक्तांनी बेस्टला कृती आराखडे देण्यापलीकडे आर्थिक मदत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका अद्याप घेतलेली नव्हती. यामुळे आयुक्तांवर कोणत्याही कर्मचारी युनियनचा विश्वास नसल्याने लेखी आश्वासन देण्याची मागणी करण्यात आली. आयुक्त आश्वासन लेखी देत नसल्याने संप पुकारण्यात आला आहे. आयुक्त लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे कर्मचारी कृती समितीकडून सांगण्यात आले आहे.
मागण्या -
बेस्ट कामगारांचा पगार महिन्याच्या दुसर्या दिवशी करावा
बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा
महापालिकेने बेस्टला दिलेले कर्ज अनुदान जाहीर करावे
पालिका आकारत असलेल्या विविध करातून सूट मिळावी
बेस्ट उपक्रमाची सर्व जबाबदारी पालिकेने घ्यावी
दुपारी मातोश्रीवर बैठक -
बेस्टच्या संपामुळं मुंबईकरांचे हाल होत असलेले याची दखल घेऊन संपावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कामगारांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी बेस्ट कामगार कृती समितीचे नेते आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेणार आहेत.