मुंबई / प्रतिनिधी -
भायखळा येथील वीरमाता जीजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन दर्शनाच्या शुल्कात महापालिकेने वाढ केल्यानंतर राणीबागेत व पेंग्विन पाहण्यास येणाऱ्या लोकांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. १ ऑगस्ट पासून शुल्कवाढीनंतर ज्यांच्या खिशाला परवडते असे लोकच आता पेंग्विन पाहण्यासाठी येत असल्याने गरीब व सामान्य मुंबईकरानी पेंग्विन दर्शन परवडत नसल्याने त्याकडे पाठ फिरवली आहे. पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असताना प्रवेशशुल्कात केलेल्या दरवाढीमुळे उद्यानाच्या उत्पन्नात सात पटींनी वाढ झाली आहे. सामान्य व गरीब मुंबईकरांनी पाठ फिरवल्याने आता पैसेवालेच उद्यानाला भेट देत असल्याने उत्पन्नात होणाऱ्या वाढीमुळे उद्यान प्रशासन मात्र खुश आहे.
शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हट्टाखातर राणीबागेत हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. पेंग्विन पाहण्यासाठी व राणीबागेतील प्रवेश शुल्क वाढवण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार केला होता. शुल्कवाढीला भाजपा, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी विरोध करत दरवाढ रोखून धरली होती. नव्या दरवाढीला मंजुरी मिळेपर्यंत राणीबागेत लहान मुलांना २ व प्रौढांना ५ रुपये शुल्काद्वारे प्रवेश देण्यात येत होता. मुंबईसह, राज्याच्या कान्याकोपऱ्यातून रोज ६ ते ७ हजार लोक पेंग्विन बघायला येत असत सुट्टीच्या दिवशी हाच आकडा तब्बल १० ते २० हजारांवर जात होता. यातून राणीबागेला दररोजचे १० ते १५ हजार तर सुट्टीच्या दिवशी ५० ते ६० हजाराचे उत्पन्न मिळत होते. सुट्टीच्या व इतर दिवशी पेंग्विन दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना आवरण्यासाठी पालिकेने शुल्कवाढ करून लोकांची गर्दी कमी करण्यासाठी प्रवेश शुल्कवाढीचा प्रस्ताव तयार केला होता.
प्रवेश शुल्कवाढीच्या प्रस्तावाला पालिकेने मंजुरी दिल्यानंतर १ ऑगस्ट पासून दरवाढ लागू करण्यात आली आहे. यानुसार १ ऑगस्टपासून चार व्यक्तींच्या कुटुंबाला १०० रुपये, तर एका व्यक्तीला ५० रुपये, १२ वर्षापर्यंतच्या मुलांकडून २५ रुपये शुल्क आकारले जात आहेत. परदेशी पर्यटकांना (१२ वर्षांवरील) ४०० रुपये, १२ वर्षांपर्यंतच्या मुलांकडून २०० रुपये तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून मासिक १५० रुपये शुल्क आकारले जात आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येत आहे. शुल्कवाढीनंतर दररोज २ ते अडीच हजार लोकच पेंग्विन पाहण्यासाठी येत आहेत. दरवाढीमुळे १ ऑगस्टला ६५ हजार, ३ ऑगस्टला ८५ हजार तर ४ ऑगस्टला ८४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शुल्कवाढीनंतर उत्पन्नात सात ते आठ पटींची वाढ झाली आहे. या वाढलेल्या उत्पन्नामुळे राणीच्या बागेत आणखी सुधारणा करण्यात येतील असे उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.