खाजगी वसाहतीमधील झाडांच्या फाद्यांची छाटणी मोफत होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खाजगी वसाहतीमधील झाडांच्या फाद्यांची छाटणी मोफत होणार

Share This

मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईमधील खासगी वसाहती, जुन्या चाळी आणि व्यावसायिक बांधकामांवरील झाडांच्या धोकादायक ठरणार्‍या फांद्या तोडण्यासाठी कंत्राटदारांकडून जास्त दर आकारण्यात येतो. पालिकेकडून फांद्या तोडण्यासाठी जास्त आकारण्यात येणाऱ्या दरामुळे सामान्य मुंबईकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खासगी निवासी जागांवरील झाडांच्या फांद्या कापणे आणि झाडे कापण्याची कामे मोफत करावीत अशी मागणी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली होती. याला सभागृहाने मंजुरी दिल्याने खाजगी वसाहतीत राहणाऱ्या लाखो मुंबईकर नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात असणार्‍या झाडांच्या फांद्या तुटणे, झाड उन्मळून पडणे यामुळे अनेक वेळा नागरिकांना दुखापती होण्याच्या घटना घडतात. या झाडांचे जतन करणे, धोकादायक फांद्यांची पावसाळ्याआधी तोडणी करणे ही जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र महापालिका या फांद्या तोडण्याची फक्त परवानगी देते. प्रत्यक्ष काम कंत्राटदाराकडून केले जाते. यासाठी कंत्राटदार आकारत असलेली अवाजवी रक्कम मध्यमवर्गीयांना परवडत नाही. शिवाय हे काम करण्यासाठी कंत्राटदाराकडू अनेक वेळा टाळाटाळ करण्यात येते. त्यामुळे खासगी निवासी धोकादायक फांद्या छाटणे, झाडे कापणे ही कामे मोफत करावी आणि व्यावसायिक संकुलांच्या आवारातील झाडांची छाटणी करताना महापालिकेने पूर्वीच्या धोरणाप्रमाणे शुल्क आकारावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी ठरावाची सूचना सभागृहात मांडली होती. हि ठरावाची सूचना सभागृहाने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवली आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages