मुंबई / प्रतिनिधी - एसआरए घोटाळा प्रकरणात सहभागी असलेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी घेऊन शनिवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घाटकोपर रेमंड शोरूम, कैलास टॉवर, वल्लभबाग लेन, घाटकोपर पूर्व येथून कुकरेजा टॉवर येथील निवासस्थानाबाहेर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मेहता यांनी राजीनामा द्यावा म्हणून शांततापूर्ण निदर्शने करण्यात येतील अशी माहिती निरुपम यांनी दिली आहे.
एम. पी. मिल एसआरए घोटाळा प्रकरणी नाव गाजत असतानाच प्रकाश मेहता यांनी आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला. म्हाडाने परत घेतलेला भूखंड त्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून परत विकासकाला दिला. तसेच याला विरोध करणाऱ्या अधिकार्याचीही त्यांनी बदली केली. या त्यांच्या मनमानी कारभारामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसतर्फे केली जात आहे. या मोर्चामध्ये संजय निरुपम यांच्या समवेत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
