कुलगुरू, शिक्षण मंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा – संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 August 2017

कुलगुरू, शिक्षण मंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा – संजय निरुपम


मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे मुंबई काँग्रेसतर्फे आज कालिना येथील मुंबई विद्यापीठावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी या प्रकरणाला कुलगुरू संजय देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे व रवींद्र वायकर जबाबदार आहेत. त्यामुळॆ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिघांचा राजीनामा घ्यावा व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांवर आरएसएसचा दबाव आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की आरएसएसचे हेच कळत नाही आहे. संजय देशमुख आणि विनोद तावडे हे आरएसएसशी संलग्न असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही असा आरोप निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम पुढे म्हणाले की आमच्या शिष्टमंडळाने कुलगुरू संजय देशमुख यांची भेट घेतली तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो कि तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, परंतु आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागत आहे. आम्ही त्यांना ठणकावून सांगितलॆ कि तुम्ही तुमचे काम करण्यास संपूर्णतः नापास झालेले आहात. तुमच्यापेक्षा अनेक विद्वान या जागेसाठी उपलब्ध आहेत. ते या जागेवर बसून चांगले काम करू शकतात. तुम्ही त्वरित राजीनामा द्यावा. विद्यार्थी आणि पालक अजून हि संभ्रमात आहेत की सर्व निकाल कधी लागणार आहेत. मुख्यमंत्री ५ ऑगस्ट सांगत आहेत आणि कुलगुरू आता १५ ऑगस्ट सांगत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व जण संभ्रमात आहोत. आमची अशी मागणी आहे की कुलगुरूंनी त्वरित या संपूर्ण निकालांची आत्तापर्यंतची खरी माहिती विद्यार्थी, पालक आणि मीडिया समोर जाहीर करावी. किती निकाल तयार आहेत ? किती निकाल बाकी आहेत? किती पेपर तपासायचे शिल्लक आहेत. खरंच १५ ऑगस्ट पर्यंत सर्व निकाल लागणार आहेत कि नाही? याची माहिती द्यावी.

निरुपम पुढे म्हणाले की ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाचे काम सुरु आहे त्यावरून आम्हाला वाटत नाही कि १५ ऑगस्ट पर्यंत सर्व निकाल लागतील, त्यामुळे आमची मागणी आहे कि कुलगुरू संजय देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे व रवींद्र वायकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले कि शिवसेना सत्तेत असून हि आंदोलनाचे नाटक करीत आहे. शिवसेनेला विद्यार्थ्यांची काळजी असेल तर त्यांनी त्यांचे मंत्री रवींद्र वायकर यांचा राजीनामा घ्यावा. शिवसेना लोकांची फसवणूक करत आहे. सत्तेत हि राहते आहे आणि विरोध हि करत आहे. ते त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही आहेत. मुंबई काँग्रेसच्या या निषेध मोर्चाला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व एनएसयूआयचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी संजय देशमुख व विनोद तावडे यांचे पोस्टर्स जाळण्यात आले तसेच डॉ. आंबेडकर भवन येथील कुलगुरूंच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले, त्यानंतर एका शिष्टमंडळाने संजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा राजीनामा मागितला.

Post Bottom Ad