मुंबई । प्रतिनिधी -
कुर्ला एल विभाग येथील सुंदरबागेतील डोंगराळ भागात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. हि समस्या सोडवण्यासाठी फिनिक्स मॉल शेजारील महापालिकेच्या उद्यानात पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. एल विभाग प्रभाग समितीचे अध्यक्ष व नगरसेवक दिलीप लांडे यांनी अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जीं त्यांच्याकडे केली होती. हि मागणी मंजूर करण्यात आली आहे.
दिलीप लांडे यांनी कुर्ला विभागातील विविध समस्यांबाबत आज संजय मुखर्जी यांची भेट घेऊन सत्यनगर ते काळे मार्ग पर्यंत पर्जन्य जल वाहिन्या व गटारे बनवावीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान ते उमा माहेश्वरी मार्ग पर्यंत मलनिस्सारण वाहिनी टाकावी, कुर्ला विभागाती गेले ३० ते ४० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदली कराव्यात, अंधेरी घाटकोपर लिंक रॉड साकिनाका ते काळे मार्ग पर्यंत रस्ता रुंदीकरण केलेल्या जागेवर १२ इंची व्यासाची जलवाहिनी टाकावी तसेच सुंदरबाग, शासकीय वसाहत, अंबिका नगर, सूर्योदय सोसायटी इत्यादी विभागात कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असतो. हा पाणीपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी लांडे यांनी एका निवेदनाद्वारे केली. यावर संजय मुखर्जी यांनी जुन्या जल वाहिन्यांचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतलं जाईल. अपुरा पाणी पुरवठा होणाऱ्या विभागात तपासणी करून निर्णय घेतला जाईल असे मुखर्जी यांनी सांगितल्याची माहिती लांडे यांनी दिली.
