माणगाव प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी -
मुंबई । प्रतिनिधी -मुंबई गोवा महामार्गातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदला वाटपात दलालांना पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे माणगावचे प्रांताधिकारी बाळासाहेब तिडके आणि बेकायदेशीर व्यवहारांना देणाऱ्या तहसीलदार उर्मिला पाटील यांची कायदेशीर चौकशी करावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी वसंतदादा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शरद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यामागणी संदर्भात मुख्यमंत्री, लाच लुचपत विभाग, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, माणगाव पोलीस ठाणे यांना निवेदन दिले असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
मुंबई गोवा महामार्गाच्या मोबदल्याच्या वाटपात भ्रष्टाचार उघड करण्यासाठी वसंतदादा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शरद सावंत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम सुरु आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला प्रांताधिकारी यांच्या मार्फत दिला जात आहे. हा मोबदला दिला जात असताना याठिकाणी दलालांची मोठी टोळी उभी राहिली आहे. हे दलाल प्रांत अधिकारी यांना पाच व स्वतःसाठी एक टक्के रक्कम दिल्यास प्रकल्पग्रस्तांना त्वरित मोबदला दिला जाईल असे सांगून प्रकल्पग्रस्तांकडून पैसे उकळत आहेत. जे कोणी पैसे देत नाहीत त्यांची प्रकारणे लवकर मंजूर करण्यात येत नाहीत असे सावंत यांनी सांगितले.
सावंत यांनी विकत घेतलेल्या जमिनीच्या शासकीय कार्यालयात नोंदी बदलल्यानंतरही जुन्याच मालकाचे नाव सावंत यांच्या सहलावण्यात आले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर इतर ल;ओकांची नावे लागली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत प्रांत अधिकारी तिडके यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भलत्याच लोकांना मोबदल्याचे वाटप होण्याची शक्यता असल्याची भीती सावंत यांनी व्यक्त केली. या सर्व प्रकरणाकडे रायगड जिल्हाधिकारी कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.