
डिसेंबर अखेरीस विद्यार्थ्यांना मिळणार टॅब -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने दिलेल्या वचनाप्रमाणे मागील तीन वर्षापूर्वी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना टॅब वितरीत करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना वेळेवर टॅब वितरित करण्यात आले. मात्र यावर्षी शाळा सुरु होऊन चार महिने झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांना टॅब मिळले नसल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शाळा सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी शालेय वस्तू वाटप केल्या असा गाजावाजा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना टॅब खरेदी अद्याप केलीच नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत टॅब पोचेपर्यंत आणखी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शिवसेनेने राबवलेली संकल्पना यावर्षी मात्र फोल ठरल्याची चर्चा आहे.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने टॅब योजना सुरू केली. योजना सुरू झाल्यानंतर टॅब घोटाळ्यांचे आरोप प्रत्यारोप गाजले. त्यामुळे योजनेच्या प्रारंभीच प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. पालिका शाळांत शिकणारी बहुतांशी मुले, मोलमजुरी करणाऱ्या पालकांची असल्याने टॅब योजना मुलांना प्रेरित करणारी ठरली. आरोप प्रत्यारोपात ही सुरुवातीला टॅब योजना व्यवस्थित रित्या राबवली. कोट्यवधी रुपयांची पालिका अर्थसंकल्पात तरतुद केली आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणात टॅब खरेदीची प्रक्रिया लांबली आहे. या टबमध्ये येत्या आठवी आणि नववीचा पूर्ण अभ्यासक्रम असल्याने मागील चार महिन्यात टॅब उपलब्ध नसल्याने मुलांना पुन्हा दप्तराचे ओझे पेलावे लागते आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले असताना टॅब का उपलब्ध झाले नाहीत, असा सवाल पालकांकडून विचारला जातो आहे.
दरम्यान, या वर्षाअखेरपर्यंत तरी मुलांच्या हातात टॅब मिळावेत, यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सुमारे 13 हजार टॅब खरेदी करण्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ९ वीचा अभ्यासक्रमात बदल झाल्याने ९ वीतील मुलांचे जुने टँब ८ वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र ९ वी च्या विद्यार्थ्यांना अद्याप टॅब ची प्रतीक्षा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील टॅब योजना मार्गी लावण्यास पालिकेतील सेनेचे सदस्यांनीच याकडे दुर्लक्ष केल्याचे सध्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यास सत्ताधारी पक्षांला अपयश आल्याने टॅब योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.
