मुंबई | प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीत भांडूप विभागातील प्रभाग क्रमांक ११६ मधील निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर या प्रभागात ११ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत प्रमिला पाटील यांच्या सुनेविरुद्ध शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांना रिंगणात उतरवल्याने भाजपा आणि शिवसेना यांच्यातच खऱ्या अर्थाने चुरस असल्याचे दिसत आहे.
दिवंगत प्रमिला पाटील यांच्या मुलाने आणि सुनेने भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपने त्यांची सून जागृती पाटील यांना येथून उमेदवारी दिली असून त्याच्या विरोधात शिवसेनेचे स्थानिक आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसकडून प्रमिला सिंह या निवडणूक लढवीत आहे, या प्रभागामधून एकूण आठ उमेदवार निवडणुकीस उभे असून मुख्य लढत शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीमुळे फेब्रुवारी २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले आहेत. आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार जिंकल्यास पालिकेतील सत्तेतील समीकरण बदलले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.