मुंबई। प्रतिनिधी -
‘बेस्ट’ने प्रवास करणार्या ६० वर्षांवरील प्रवाशांना लवकरच तिकिटात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. जेष्ठ नागरिकांना अशी सवलत देण्यासाठी महापालिकेकडून ‘बेस्ट’ला एक कोटीचे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ‘बेस्ट’ने प्रवास करणार्या जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बेस्ट बसमध्ये अपंगांना तिकिटावर सवलत दिली जाते. जेष्ठ नागरिकांना अशी सवलत मिळावी अशी मागणी गेले कित्तेक वर्षे केली जात होती. ‘बेस्ट’मध्ये वयोवृद्ध प्रवाशांना खास आसने आरक्षित असतात. शिवाय वृद्धांना पुढील दरवाजाने गाडीत चढण्याचीही मुभा असते. मात्र इतर शासकीय प्रवासी वाहतुकीमध्ये मिळणार्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’मध्ये सवलत मिळत नव्हती. यामुळे बेस्ट बसने प्रवास करणार्या ६० वर्षांवरील प्रवाशांना तिकीटात ५० टक्के सवलत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने पालिकेकडे केली होती. यानुसार २०१७-१८च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत द्यावी यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतच्या मंजुरीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात राहणारे आणि ‘बेस्ट’ने प्रवास करणार्या दृष्टिहिन आणि ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मुंबईत ‘बेस्ट’ने मोफत प्रवास करता यावा यासाठी महापालिकेकडून सहा कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली आहे.