मुंबई दि. २६ (प्रतिनिधी) - मालाड स्टेशन पासून कुरार गावाकडे जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. आमदार सुनील प्रभू यांनी गेल्या दोन वर्षांपासून एमएमआरडीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्यातून तब्बल २६ कोटींच्या खर्चातून हे सुसज्ज रुंदीकरण करण्यात येत आहे. चौपदरी रस्ता, स्वतंत्र पादचारी मार्ग आणि अवजड वाहनांनाही सहज ये-जा करता येणाऱ्या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असल्यामुळे कुरार गाव ते मालाड स्टेशनचा प्रवास आता सुस्साट होणार आहे.
दिंडोशी विधानसभेतील मालाड स्टेशन पासून कुरार गावाकडे जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्यातून तब्बल २६ कोटींच्या खर्चातून हे सुसज्ज रुंदीकरण करण्यात येत आहे. कुरार गाव येथील नागरिकांना मालाड स्टेशन गाठण्यासाठी चिंचोळ्या भुयारी मार्गातून जावे लागते. येथील लोकवस्तीही प्रचंड वाढल्याने या ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून चालणेही मुश्कील होते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लाखो नागरिक आणि रुग्णालयात जाणारे रुग्ण यांची प्रचंड रखडपट्टी होत होती. वाहनांना मालाड स्टेशनवर जाण्यासाठी वळसा घालून जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील प्रभू यांनी गेल्या दोन वर्षांपासून एमएमआरडीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये ३० मीटर रूंद, चार मीटर उंच हा भुयारी मार्ग बनवण्यात येत आहे. भुयारी मार्गाच्या रुंदीकरणामुळे लाखो कुरारवासीयांना मालाड स्टेशनवर जाण्यासाठी सलग सुसज्ज मार्ग मिळणार आहे. शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी भूमिपूजन केलेल्या कुरार भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी आमदार सुनिल प्रभु यांनी एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महापालिका अधिकाऱ्यांसोबत केली. २०१९ मध्ये मेट्रोच्या स्थानकाचे काम पूर्ण होत असताना भुयारी मार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी कंत्राटदार व एमएमआरडीएचे अधिकारी अहोरात्र काम करत आहेत त्यांना लागेल ती मदत महालिकेच्या अधिकाऱ्यांनी करावी अशा सूचना आमदार सुनिल प्रभु यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
तसेच टाईम्स ऑफ इंडिया कडे जाणाऱ्या वाहतुकीला पश्चिम द्रुतगती मार्गा खालून फ्री यू मिळावा म्हणून शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुनिल प्रभु सतत सातत्याने सार्वजनिक बांधकाम खाते व एमएमआरडीए प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांकडून विशेषबाब म्हणून फ्री यू च्या कामासाठी अर्थसंकल्पात ५० लाखांची तरतूद करून हे काम या आर्थिक वर्षात सुरू व्हावे म्हणून पाठपुरावा करून फ्री यू च्या कामाची सुरुवात एमएमआरडीए मार्फत झाली. आणि या ठिकाणच्या कामाचा पाहणी दौरा आमदार सुनिल प्रभु यांनी एमएमआरडीएचे प्रकल्प (प्रोजेक्ट) व परिरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी दौरा केला. हा मार्ग व्हावा अशी रहेजा वसाहत व टाइम्स ऑफ इंडियाच्या मागील वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांची मागणी होती. या मार्गामुळे रहेजा वसाहतीत व टाइम्स ऑफ इंडियाच्या मागील वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना रहदारी करणे सोयीचे ठरणार आहे. हा फ्री यू व्हावा म्हणून नगरसेवक असताना सुनिल गुजर, उपविभाग संघटक रीना सुर्वे, शाखाप्रमुख प्रभाकर राणे आणि शाखा।संघटक ऋचिता आरोसकर यांनी नागरिकांच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने एमएमआरडीए प्रशासनाकडे आग्रह धरला होता. हे काम देखिल दिवाळी पूर्वी पूर्ण करून नागरिकामसाठी फ्री यू सुरू करावा अशा सूचना आमदार सुनिल प्रभु यांनी एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांना दिल्या. सदर काम युद्ध पातळीवर सुरू असून फ्री यू व सुशोभीकरणाचे काम लवकरच प्रगतीपथावर येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक गणपत वारिसे, प्रशांत कदम, सुनिल गुजर, उपविभाग प्रमुख विष्णू सावंत, शाखाप्रमुख अशोक राणे, प्रदीप निकम, राजू घाग, एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता जामदार, देठे, कनिष्ठ अभियंता शेख यांच्यासह महापालिकेचे मलनिस्सारण विभागाचे उप-प्रमुख अभियंता गीते, इंजिनिअर, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे कनिष्ठ अभियंता शिंदे, पी उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता परिरक्षण अमित जाधव उपस्थित होते.