शिवसेनेचा भाजपाला "मनसे" धक्का - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 October 2017

शिवसेनेचा भाजपाला "मनसे" धक्का


मुंबई । प्रतिनिधी -
केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन झालेल्या मुंबई महानगरपालिकेत सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला शिवसेनेने जोरदार राजकीय धक्का दिला आहे. भांडूपच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार जिंकल्यावर च्या 'लवकरच मुंबईत आमचा महापौर' असं खुलं आव्हान किरीट सोमय्यांनी दिले असताना शिवसेनेला मनसेच्या सहा नागरसेवकांना आपल्या गळाला लावण्यात यश आले आहे. महापालिका अधिनियमातीतील तरतुदीनुसार पक्षाच्या एकूण संख्येच्या दोन तृतीयांश गट फुटून त्यांनी नवा गट तयार केला, तर त्यांच्याविरोधात पक्ष विरोधी कारवाई होत नाही. त्यामुळेच मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांना फोडून त्यांचा वेगळा गट करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्याचं म्हटलं जात आहे.

फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. माजी उपमहापौर आणि भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन झाल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८१ झाले आहे. आता प्रभाग क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील निवडून आल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८२ वर कायम राहिले आहे. भांडुप पोटनिवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला होता. त्यामुळे भाजपचे पालिका सभागृहातील संख्याबळ वाढले होते. तेव्हा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी लवकरच मुंबई महानगपालिकेवर भाजपची सत्ता व महापौर येईल, असा दावा केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात काहीशी धास्ती पसरली होती. मात्र, त्यानंतर शिवसेना नेते अनिल परब आणि विश्वनाथ महाडेश्वर यांच्या माध्यमातून राजकीय चक्रे वेगाने फिरली आणि त्यांनी थेट मनसेच्या सहा नगरसेवकांना गळाला लावले आहे. मनसेचे सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले असल्याने वॉर्ड क्र. १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे हे एकमेव मनसेचे नगरसेवक उरलेले आहेत.

मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांचे गटनेते पद शाबूत राहताना मनसेचाच वेगळा गटही ठेवला जाणार आहे. मनसेच्या या सहाही नगरसेवकांनी पालिकेमध्ये आपला वेगळा गट स्थापन करत शिवसनेंवर आपला वचक ठेवण्याची आणि पालिकेतील समितीमधील आणखी काही पदे आपल्या पदरात पाडून घेण्याची रणनीती आहे. मनसेच्या या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांनाकडे नेऊन त्यांचा पाठिंबा घेण्याची शिवसेनेची रणनीती आहे. शिवसेनेबरोबर जाणाऱ्या या नगरसेवकांमध्ये राज यांच्या अनेक निष्ठावान सहकाऱ्यांचा समावेश आहे. आमच्या परवानगीशिवाय हा गट स्थापन करण्यात आलाय. आम्ही याची तक्रार कोकण विभागीय आयुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, एकूणच शिवसेनेच्या या खेळीने मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांना मोठा झटका दिल्याचं बोललं जातय. दरम्यान मनसेच्या या सर्व सहाही नगरसेवकांना पक्षात सामावून घ्यावे अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. दरम्यान याबाबत मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे.

मनसेच्या सहाही नगरसेवकांचा शिवसनेत प्रवेश - 
मनसेच्या सहा नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्यावर सायंकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी हे सहाही नगरसेवक आज पुन्हा आपल्या घरात परतले आहेत. हे फोडाफोडीचं राजकारण नाही. काही जण आम्ही घोडेबाजार केल्याचं म्हणत आहे. पण घोडेबाजारावर गाढवांनी बोलू नये, असं मला वाटतं. त्यांनी यापूर्वी स्वत: कुठेकुठे घोडेबाजार केला आहे, हे आठवावं. एका दिवसात शिवसेना एवढी जमवाजमव करत असेल, तर शिवसेनेची ताकद सर्वांना समजलीच असेल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढले -
भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार विजयी झाल्याने भाजपचे संख्याबळ 82 तर शिवसेनेची संख्या 84 झाली. त्यातच शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र पडताळीत खोटे निघाल्याने त्याचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. त्यांच्या जागी शिवसेनेचे राजू पेडणेकर यांना नगरसेवक पद देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे 84 सदस्य निवडून आले होते. राजू पेडणेकर यांच्यामुळे हि संख्या 85 झाली आहे. शुक्रवारी मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 91 झाली आहे. शिवसेनेला 3 अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला असल्याने सध्या शिवसेनेकडे 94 नगरसेवकांचे संख्याबळ झाले आहे. तर भाजपचे 82 व 2 अपक्ष मिळून 84 असे संख्याबळ असणार आहे.

सोमय्यांची तक्रार -
मनसेच्या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांनाकडे नेऊन त्यांचा पाठिंबा घेण्याची रणनीती शिवसेनेने खेळली असून ही खेळी लक्षात येताच भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांनी कोकण विभागीय आयुक्त, लाचलुचपत विभाग, पोलिसांना पत्र पाठवून या सर्व नगरसेवकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेच्या गळाला लागलेले मनसेचे नगरसेवक
अर्चना भालेराव – वॉर्ड १२६
परमेश्वर कदम – वॉर्ड १३३
अश्विनी मतेकर- वॉर्ड १५६
दिलीप लांडे – वॉर्ड १६३
हर्षला मोरे – वॉर्ड १८९
दत्ताराम नरवणकर- वॉर्ड १९७

Post Bottom Ad

JPN NEWS