केंद्र आणि राज्यातल्या सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे सर्वच घटकांची फसवणूक करणारे भाजपचे सरकार बंडलबाज आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारताना झालेल्या विषबाधेमुळे 22 शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. 750 शेतक-यांना विषबाधा झाली आहे. राज्यात रोज शेतकरी मरतायेत पण सरकार मात्र निष्क्रिय आहेत. सरकारच्या या निष्क्रियते विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधीत करताना खा. चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यवतमाळमध्ये किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत पण सरकारला याचे काही देणे घेणे दिसत नाही. मुख्यमंत्री अद्याप यवतमाळला आले नाहीत. या सरकारला संवेदनाच राहिली नाही. सरकारने या घटनेला जबाबदार असणा-या लोकांवर तात्काळ कठोर कारवाई असे चव्हाण म्हणाले.
भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन तीन वर्षात पूर्ण केले नाही. या सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले, अन्नधान्याच्या किमती वाढवल्या, महागाई वाढवली, जातीय तणाव वाढवला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी समाजवरील अत्याचारात वाढ झाली. मराठा, मुस्लीम, धनगर समाजाची आरक्षणाचे गाजर दाखवून सरकारने फसवणूक केली आहे. काल परवा झालेल्या अतिवृष्टीत गाजराचे पीक वाहून गेले आहे त्यामुळे या सरकारची गाजराची पुंगी वाजणार नाही असा टोला चव्हाण यांनी लगावला.
शेतकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी ,तरूण कोणीही या सरकारच्या कमाकाजावर समाधानी नाही. या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. अद्याप एकाही शेतक-याला कर्जमाफीचा एक रूपयाही मिळाला नाही. जीएसटीमुळे व्यापार ठप्प झाला आहे. बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना रोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे परिवर्तनाची गरज आहे काँग्रेस पक्ष परिवर्तनासाठी रस्त्यावरून संघर्ष करायला तयार आहे तुम्ही साथ द्या परिवर्तन घडवू असे आवाहन चव्हाण यांनी केले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी आ. वामनराव कासावार, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनीही सरकारवर जोरदार टीका केली.
या मोर्चाला प्रदेश सरचिटणीस व यवतमाळ जिल्हा प्रभारी शाम उमाळकर, रामकिशन ओझा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल ठाकरे, माजी आ. नंदिनी पारवेकर, प्रदेश सचिव डॉ. मोहम्मद नदीम यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.