मध्य रेल्वेच्या मोटरमन्सचं 'नो ओव्हरटाईम' आंदोलन सुरु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2017

मध्य रेल्वेच्या मोटरमन्सचं 'नो ओव्हरटाईम' आंदोलन सुरु


मुंबई । प्रतिनिधी -
रात्रंदिवस सलग सेवा बजावूनही रेल्वेकडून योग्य वागणूक मिळत नसल्याने मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी रविवारपासून १५ ऑक्टोबरपासून जादा काम न करण्याचं ठरवलं आहे. या मोटरमन्सनी रविवारपासून 'नो ओव्हरटाईम' आंदोलन सुरु केले आहे. याचा परिणाम म्हणून रेल्वेला आता अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.

उपनगरीय लोकलसेवेत दर ४ मिनिटाला १ लोकल याप्रमाणे १६०० हून अधिक फेऱ्या चालवल्या जातात. मुंबई उपनगरीय सेवेला भौगोलिक मर्यादा असल्याने मोटरमन प्रचंड तणावाखाली काम करतात. त्यामुळे काही वेळेस त्यांच्याकडून सिग्नलही चुकतो. यासंदर्भात शिक्षा करण्याचे इतर मार्ग असतानाही मोटरमन्सची थेट नोकरीच घालवण्याची धमकी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी. सी. सुमन यांनी दिली आहे. त्यामुळे मोटरमनच्या डोक्यावर नोकरीची टांगती तलवार असल्याने मानसिक तणावाने मोटरमनकडून आणखी चुका घडण्याची शक्यता असल्याचं रेल कामगार सेनेच्या मोटरमन युनिटचे प्रवक्ते संजय जोशी यांनी सांगितलं. मोटरमनकडून सिग्नल चुकल्यास त्यांची नोकरीच घालविण्याची धमकी रेल्वे प्रशासनाने दिल्याने मोटरमन्सनी रविवारपासून नियमानुसारच काम करण्याचा इशारा दिला आहे. मध्य रेल्वेवर ८०० मोटरमन्स असून २३० मोटरमनच्या जागा रिक्त आहेत. तरीही मोटरमन जादा काम करून रेल्वेला सहकार्य करतात. अशावेळी त्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार असताना ते काम कसं करणार? असा सवालही केला जात आहे.

आतापर्यंत १३ ते १५ मोटरमन्सना अशा 'स्पॅड' किंवा 'ओव्हरशूट' सारख्या प्रकरणात दोषी ठरवून नोकरीवर गदा आणण्याचा वरिष्ठ विभागीय अभियंता डी. सी. सुमन यांचा डाव असल्याचं मोटरमनचं म्हणणं आहे. त्यामुळे मोटरमननी आंदोलनाचा निर्णय घेतला असून त्यात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, सेंट्रल रेल्वे मोटरमन असोसिएशन, ऑल इंडिया ओबीसी, ऑल इंडिया एससी, एसटी यांचा पाठिंबा असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रविवारपासून मोटरमन जादा काम करणार नसल्यामुळे ६०० ते ७०० फेऱ्याचा दररोज रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा एल्फिन्स्टन सारखी घटना घडल्यास रेल्वेच जबाबदार असणार असल्याचा इशारा मोटरमन संघटनेने दिला आहे. रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून मोटरमन्सच्या पाठिशी रेल कामगार सेना असल्याचं सरचिटणीस दिवाकर उर्फ बाबी देव यांनी सांगितलं.

Post Bottom Ad