बेस्टमधील फुकट्या प्रवाशांकडून 20 लाखांची दंड वसुली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 October 2017

बेस्टमधील फुकट्या प्रवाशांकडून 20 लाखांची दंड वसुली

मुंबई । प्रतिनिधी - 
'बेस्ट' उपक्रमाने मे ते ऑगस्ट 2017 या चार महिन्याच्या कालावधीत विना तिकीट फुकट्या आणि प्रमाणित अंतरापेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत 22,963 प्रवाशांना विनातिकीट व प्रमाणित अंतरापेक्षा जास्त प्रवास करताना पकडण्यात आले. या प्रवाशांकडून एकूण 20 लाख 31 हजार 492 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने तिकीटाची रक्कम अधिक दहा पट दंड भरण्यास नकार दिल्यास महापालिका अधिनियम 1888 च्या कलम 460 (ह) नुसार एक महिन्याची कोठडीत पाठवणे किंवा 200 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तसेच शिक्षा म्हणून कोठडी व दंड वसुली एकत्रीत केली जाऊ शकते. यामुळे प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान व मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट अथवा बसपास घेऊन प्रमाणित केलेल्या अंतरावर प्रवास करावा. अस आवाहन बेस्टतर्फे करण्यात आले आहे.

दिवाळी, भाऊबीज निमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या -
दिवाळी आणि भाऊबीजच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत 18 जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. या गाडया विर कोतवाल उद्यान प्लाझा दादर, बांद्रा, महात्मा फुले मार्केट काळबादेवी, एपीएमसी मार्केट वाशी या ठिकाणी चालवण्यात येत आहेत.  तसेच 21 ऑक्टोबरला भाऊबीजच्या दिवशी मुंबई शहर, उपनगर, मिरारोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे), रेती बंदर, कळवा तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैरणे, नेरुळ, एेरोली, घणसोली गाव, सीबीडी बेलापूर अशा विविध बसमार्गावरून एकूण 131 ज्यादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दीच्या ठिकाणी आणि रेल्वे स्थानकाबाहेरील बस थांब्यावर बस निरीक्षकांची तसेच वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad