आरपीएफ जवानाला मारहाण करणाऱ्या फेरीवाल्याला अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरपीएफ जवानाला मारहाण करणाऱ्या फेरीवाल्याला अटक

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईमधील बहुतेक रेल्वे स्थानकाचा परिसर फेरीवाल्यांनी व्यापला आहे. एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान फेरीवाल्यांविरोधात कारवाई करणाऱ्या रेल्वे पोलिस बलाच्या (आरपीएफ) जवानाला एका फेरीवाल्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी कुर्ला टर्मिनसमध्ये घडली. या मारहाणप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एका फेरीवाल्याला अटक केली आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी हटवण्याची मागणी होऊ लागली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही इशारा मोर्चा काढत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वे परिसरात फेरीवाल्यांवर सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाई करण्यास सुरू केली आहे. मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन असलेल्या कुर्ला टर्मिनस यार्ड येथे आरपीएफचे पोलिस शिपाई विकास पाटील हे गस्तीवर होते. या ठिकाणी नागरिकांना येण्यास मनाई आहे. त्या ठिकाणी अरविंद येरूणकर हा व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसला. पाटील यांनी चौकशी केली असता येरुणकर हा रेल्वे स्थानक परिसरात पाण्याची बाटली विकण्यासाठी आल्याचे उघड झाले. फेरीवाल्यांना स्थानक परिसरात कोणतेही साहित्य विकण्यास मनाई असल्याने पाटील यांनी येरुणकरला पोलिस चौकीत येण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर येरुणकरने हातातील पक्कडने पाटील यांना मारहाण केली व पळ काढण्याचा प्रयत्न केला. येरुणकर हा पळ काढण्याच्या तयारीत असतानाच पाटील यांनी त्याला पकडून धरले व सहकाऱ्यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पाटील यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर येरूणकरला अटक करण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages