मुंबई | प्रतिनिधी -
परळ-एल्फिन्स्ट रोड पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांनी सलग दोन दिवस पंधरा तास मॅरेथॉन बैठक घेऊन सुचवलेल्या उपाययोजनांचा कालबध्द पध्दतीने पाठपुरवा करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय “पाठपुरावा समिती” गठीत करण्यात आली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली असून यामध्ये आमदार भाई गिरकर, माजी आमदार मधू चव्हाण, नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचा समावेश आहे. याबाबत बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, ही समिती रेल्वे मंत्र्यांनी सूचवलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहे. तसेच रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी यांना जाब विचारून कामे वेळेत पुर्ण होत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम करेल.
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दादर वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजपच्या पदाधिकाऱयांची कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई पदाधिकाऱयांसह राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर ही उपस्थित होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीनंतर त्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचना मुंबई पदाधिकरी आणि वॉर्ड अध्यक्षांपर्यंत पोहचविण्यासाठी व संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी संघटन मंत्री सुनिल कर्जतकर यांनी पक्षाने नियुक्त केलेले विस्तारक आणि त्यांनी घेतल्या बैठका यांचा आढावा घेतला तसेच बुथ पातळीवर दहा सदस्यांची कमीटी गठीत करण्यात येणार असून याही योजनेचा आढावा घेण्यात आला.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी आपल्या भाषणात राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या सूचना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वॉररुमधून दिलेल्या संघटनात्क कामाची रुपरेषा, राज्य सरकारची कामे व सूचना याचा सविस्तर उहापोह या बैठकीत केला. पक्षाच्या विस्तार योजना व दोन्ही सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जाताना पदाधिकाऱयांनी कसे काम करावे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. तर सरकार आणि पक्षावर समाजमाध्यमांतून होणारी टीका त्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय उत्तर द्यावे याबाबतही त्यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन केले.